भाजपचे रमेश कराड विजयी झाल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. छाया: सुरेश गवळी
लातूर - तब्बल ३० वर्षे लातूर जिल्हा सहकारी बँकेवर एकहाती वर्चस्व राखणाऱ्या माजी मंत्री दिलीपराव देशमुखांच्या पॅनलने याही वेळेस जिल्हा बँकेत बहुमत राखले. मात्र, भाजपने दोन जागा जिंकून बँकेच्या संचालक मंडळात प्रवेश केला. जिल्हा बँकेच्या १९ जागांपैकी १३ जागा बिनविरोध निवडून आल्या. उर्वरित सहा जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये अहमदपूरमधून राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबासाहेब पाटील, जळकोटमधून धर्मपाल देवशेट्टे, देवणीत भगवान वामनराव पाटील, चाकूरमध्ये नागनाथ पाटील, शिरूरअनंतपाळमध्ये व्यंकट िबरादार आणि पतसंस्था मतदारसंघातून रमेश कराड विजयी झाले. या मतदारसंघात २०४ पैकी २०३ जणांचे मतदान झाले होते. त्यातील ११४ मते कराडांना मिळाली. उर्वरित ८९ मते गोविंदपूरकरांना मिळाली. २५ मतांनी कराडांचा विजय जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी शहरातून मिरवणूक काढली. विशेष म्हणजे बहुमत मिळूनही काँग्रेसच्या लोकांनी जल्लोष केला नाही. त्यांना कराड विजयी झाल्याचे शल्य बोचत राहिले.
...वेगळा अनुभव : लातूर जिल्हा निर्मितीनंतर उस्मानाबाद जिल्हा बँकेचे विभाजन होऊन स्वतंत्र लातूर जिल्हा बँक स्थापन झाली. त्या वेळी पहिले अध्यक्ष म्हणून दिलीपराव देशमुख यांची निवड झाली. त्यानंतर आजपर्यंत त्यांनी अध्यक्षपद दुसऱ्याकडे दिले असले तरी बँक
आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळवले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या साखर कारखान्यांच्या निवडणुकांत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून त्यांना चारीमुंड्या चीत करणाऱ्या देशमुखांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र वेगळा अनुभव आला.
निकालाची वैशिष्ट्ये
>देशमुख विरोधकांचा पहिल्यांदाच बँकेत प्रवेश
>देशमुखांच्या एकहाती कारभाराला बसणार खीळ
>एखाद्या निवडणुकीत कराडांचा पहिला विजय
>शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजपचा विजय
>१२०० कोटी ठेवी असलेली मराठवाड्यातील एकमेव बँक
एकाधिकारशाहीला विरोध करणार
लातूर जिल्ह्यात बँकेच्या माध्यमातून एका परिवाराची अार्थिक दहशत होती. साखर कारखाने, बाजार समिती, बँक अशा सगळ्याच ठिकाणी एकाधिकारशाही सुरू होती. त्याला आपण विरोध करणार आहोत. रमेश कराड, भाजप नेते