आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Prashant Bumb Closed Mumbai Nagpur Toll Near Lasur Station

आमदार बंब समर्थकांनी बंद पाडला टोलनाका, मुदत संपली असतानाही सुरू होती नियमबाह्य वसुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - मुदत संपल्यानंतरही नियमबाह्य टोलवसुली सुरू असल्याने मुंबई-नागपूर एक्स्प्रेस हायवेवरील लासूर स्टेशनलगतचा भानवाडी टोलनाका गुरुवारी दुपारी दोन वाजता आमदार प्रशांत बंब समर्थकांनी बंद पाडला.
भानवाडी टोलनाका हा गेल्या दहा वर्षांपासून सुरू असून येथे वाहनधारकांसाठी कोणतीही सुविधा नसताना नियमबाह्य टोलवसुली सुरू होती. टोलनाक्याच्या नियमबाह्य वसुलीबाबत आमदार बंब यांनी वेळोवेळी आंदोलने करून टोल नाका बंद पाडला होता. याप्रकरणी वारंवार वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून निवेदने दिली; परंतु अधिकाऱ्यांनी निवेदनांना केराची टोपली दाखवत टोल नाक्याला अभय दिले होते. हा रस्ता हडस पिंपळगाव- बोरदहेगावदरम्यान अत्यंत खराब असून खराब रस्त्याचा टोल वसूल करणे नियमबाह्य असल्याने व मुदत संपल्याने आमदार प्रशांत बंब समर्थकांनी नाक्यावर जाऊन जाब विचारत टोल नाक्यावरील वसुली बंद पाडली.

नियमबाह्य होत असलेल्या टोल वसुलीबाबत आमदार प्रशांत बंब यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांना या महामार्गावरील टोल नाक्याची मुदत ३१ मार्च रोजी संपली असून या नाक्यावरील होत असलेली नियमबाह्य टोल वसुली बंद करण्याचे निवेदन दिले होते. तसेच ठेकेदाराने टोल नाका स्वत:हून बंद करावा व तीन वर्षांत जास्तीचा जमा झालेला पैसा शासनाच्या तिजोरीत जमा करावा, अशी मागणी करून हा टोल नाका पुन्हा सुरू करण्यात आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. तरीदेखील दि. १ एप्रिल रोजी नियमबाह्य टोल वसुली सुरूच होती. आमदार बंब यांच्या समर्थकांनी गुरुवारी दुपारी टोल नाका बंद पाडला.

या वेळी रज्जाक पठाण, संतोष वाकळे, विनोद वाकळे, दिनेश वरकड, संजय पाटील, बबन वाकळे, बाबासाहेब नरोडे, सदाशिव शेलार, सचिन पांडे, संतोष काळे, संजोग पाटणी, अशोक शिंदे, कांतीलाल जाधव, धम्मपाल साळवे, मयूर शिरसाठ, दीपक शिरसाठ, जॉनी त्रिभुवन, अमोल गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.