आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार राहुल जगताप सामुदायिक सोहळ्यात विवाहबद्ध, शरद पवारांचे औदार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - पैशाची वारेमाप उधळपट्टी न करता अगदी आदर्शवत वाटावा अशा रीतीने सामुदायिक विवाह सोहळ्यात श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप रविवारी डॉ. प्रणोती चव्हाण यांच्याशी विवाहबद्ध झाले. या नवविवाहित दांपत्याला आशीर्वाद देण्यासाठी राज्यातील दिग्गज राजकीय नेत्यांसह हजारो लोेक उपस्थित होते. 

पिंपळगाव पिसा येथील सावित्रीबाई महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात हा सोहळा पार पडला. यावेळी एकूण ९ जोडप्यांनी संसाराच्या वेलीवर पाऊल टाकले. त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार दिलीप गांधी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकर पिचड, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, शिवसेना नेते घनश्याम शेलार, आमदार राहुल कुल व राज्यातील राष्ट्रवादीचे अनेक आमदार, आजी-माजी खासदार, माजी मंत्री, यांच्यासह राज्य व जिल्ह्यातील बडे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.  

तालुक्यातील या लाडक्या आमदाराचा विवाह पाहण्यासाठी जनतेमध्ये उत्सुकता शिगेला पोहाेचली होती. पिंपळगावचा चार-पाच किमीचा परिसर वाहने व माणसांच्या गर्दीने फुलून गेला होता. दिवसभर विवाहस्थळी शाही भोजनाच्या पंगती उठत होत्या. विवाहाच्या व्यवस्थेसाठी शेकडो स्वयंसेवक, शंभरावर बाउंसर, अनेक सुरक्षारक्षक, पोलिस, होमगार्ड, महिला पोलिस व कुकडी कारखान्याचे कर्मचारी राबत होते. दिवस मावळू लागला तसा सनई चौघड्यांचा सूर आसमंतात पसरला. वातावरण मंगलमय झाले. आमदार जगताप व  डॉ. प्रणोती यांचे विवाहस्थळी अागमन झाले. या नियोजित दांपत्यांच्या अागमनावेळी त्यांच्या समोर दाक्षिणात्य शैलीचे वाद्यवृंद लक्ष वेधून घेत होते. 

विवाह सोहळ्याचे प्रवेशद्वार स्टेजवरील, सजावट आणि व्यासपीठावर तिरुपती बालाजी मंदिराच्या पाच प्रतिकृती उभारल्या होत्या.  विवाह सुरू होण्यापूर्वी बालाजीच्या पूजेची पारंपरिक भक्ती रचना वाजवण्यात आली. त्यानंतर मंगलाष्टके सुरू झाले. मंगलाष्टकांदरम्यान वरपिता कुंडलीकराव जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले. विवाह सोहळा संपन्न होताक्षणी नव दांपत्य असलेले आमदार जगताप हे आशीर्वाद घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अासनाकडे व्यासपीठ उतरून खाली आले.  पवार, पिचड, नागवडे व अजित पवार यांचे त्यांनी पदस्पर्श करीत आशीर्वाद घेतले. पवार यांच्यासह अन्य कोणाही नेत्यांचे अशीर्वादपर भाषण झाले नाही. 
 
शरद पवारांचे औदार्य  
विवाह सोहळा संपल्यानंतर बाहेर पडताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाहनाभोवती मोठी गर्दी जमली होती. महामानव बाबा आमटे संस्थेचे अनंत झेंडे यांना पवारांशी बोलायचे होते. सुरक्षारक्षक त्यांना जवळ जाऊ देत नव्हते. पवारांनी हे पाहिले गाडीची काच खाली घेतली. झेंडे यांच्याशी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. झेंडे यांना हे अनपेक्षित होते. झेंडे यांच्या हातात त्यांच्या संस्थेविषयीची माहिती असणारे पुस्तक होते. पवारांनी ते मागवून घेतले आणि सुहास्य करीत गाडी पुढे रवाना झाली. पवारांच्या औदार्याने सर्वच जण हरखून गेले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...