आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार बोर्डीकरांना सात दिवसांची कोठडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शेतकरी सभासदांच्या साडेसात कोटी रुपयांच्या विमा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी बँकेचे अध्यक्ष आमदार रामप्रसाद बोर्डीकर दोन महिन्यानंतर जिल्हा न्यायालयात शरण आले. न्यायालयाच्या पाच तासांच्या कामकाजानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना 23 जानेवारीपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मुख्य न्यायदंडाधिकारी आर.व्ही.उत्पात यांनी हा निकाल दिला. या वेळी बोर्डीकरांच्या हजारो समर्थकांनी जिल्हा न्यायालयात गर्दी केली होती.
याप्रकरणी बँकेचे संचालक अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांच्यासह अन्य काही संचालकांनी बँकेचे अध्यक्ष बोर्डीकर यांच्याविरोधात 2 नोव्हेंबर 2011 रोजी तक्रार दिली होती. मात्र, गुन्हा दाखल न झाल्याने या संचालकांनी जिल्हा न्यायालयात दिलेल्या तक्रारीनंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे अध्यक्ष बोर्डीकर, सरव्यवस्थापक डी.एस.पवार व बनावट आयुकेअर विमा कंपनीचा कार्यकारी संचालक कुंजबिहारी अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी बोर्डीकरांसह पवार व अग्रवाल यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळला गेला. बोर्डीकर व पवार यांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील फेटाळले होते. बोर्डीकर यांचा पाच जानेवारी रोजी तर त्यानंतर पवार यांचाही अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने या दोघांची अटक अटळ होती. मात्र, ते दोघेही फरारी होते. दरम्यान, 17 डिसेंबर रोजी अग्रवाल हा गंगाखेड पोलिसांना शरण आला होता. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतरही बोर्डीकर फरारच होते. अखेर मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ते दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश कुलदीपक तुंगार यांच्या न्यायालयात हजर झाले. न्यायाधीश तुंगार यांनी बोर्डीकर यांना मुख्य न्यायदंडाधिकाºयांच्या न्यायालयात पाठविले. तेथे दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर आमदार बोर्डीकर यांना सात दिवसांची पोलिस कोठडी मुख्य न्यायदंडाधिकारी उत्पात यांनी सुनावली.
बोर्डीकरांच्या बाजूने अ‍ॅड.हर्षद निंबाळकर (पुणे) यांनी युक्तिवाद केला तर सरकारच्या वतीने अ‍ॅड.किनगावकर यांनी बाजू मांडली. त्यानंतर हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आमदार बोर्डीकर यांना मोठ्या पोलिस बंदोबस्तात जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले .
न्यायालयाला जत्रेचे स्वरूप
मंगळवारी जिंतूर व सेलू तालुक्यातील शेकडो गाड्यांचा ताफा पाथरी रोडवरील रेणुका मंगल कार्यालयात व तेथून जिल्हा न्यायालय, स्टेडियम परिसर, वसमत रोडवर या गाड्या दाखल झाल्या. कार्यकर्ते मोठ्या संख्येने न्यायालय परिसरात होते. दुपारी एक पासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत कार्यकर्ते ठाण मांडून होते. बोर्डीकर यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडून कोरेगाव रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला; परंतु ऐनवेळी बोर्डीकरांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले व तेथेच त्यांना अ‍ॅडमिट केल्याने कार्यकर्ते माघारी परतले.
डी.एस.पवार फरारीच
बँकेचे सरव्यवस्थापक डी.एस.पवार फरारी आहेत. त्यांनाही सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे.