आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावसाहेब दानवेंच्या आमदार पुत्राची सभा उधळली, शिवार संवाद यात्रेत शेतकर्‍यांच्या जोरदार घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- आमदार संतोष दानवे यांची शिवार संवाद यात्रा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. जालना तालुक्यातील रेवगाव येथे शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

आमदार दानवे यांचे भाषण सुरु होण्यापूर्वी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विविध प्रश्न विचारले. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे दानवे यांना ही सभा न घेताच जावे लागले.

शिवार संवाद यात्रेत आमदार संतोष दानवे यांनी शुक्रवारी जालना तालुक्यातील सामनगाव,नंदापूर, पीरपिंपळगाव, मौजपुरी आदी गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान सायंकाळी रेवगाव येथे त्यांची सभा आयोजीत करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे पाटील,जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे,माजी आमदार अरविंद चव्हाण आदींची उपस्थिती होती. सभा सुरु होताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत दहा प्रश्न असलेली एक प्रश्नावली आमदार संतोष दानवे यांच्याकडे दिली. नंतर कार्यकर्त्यांनी त्यांना यातील प्रत्येक प्रश्न विचारला. यात संपूर्ण कर्जमुक्ती कधी करणार,कर्जमुक्तीची योग्यवेळ कोणती, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे व कधी करणार,सलग 12 तास वीज पुरवठा कधी देणार आदी प्रश्नांचा त्यात समावेश होता. आमदार दानवे यांना हे प्रश्न विचारले जात असतानाच काही कार्यकर्त्यांनी तूरीचा प्रश्न उपस्थित केला. आमची तूर विकत घेत नाहीच मात्र खासदार दानवे शेतकऱ्यांबद्दल अपशब्द उच्चारतात असे म्हणत काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे सभेत गोंधळ उडाल्याने आमदार दानवे यांना सभा न घेताच तेथून निघून जावे लागले.

अशी होती शेतकरी संघटनेची प्रश्नावली
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती कधी देणार,कर्जमुक्तीची योग्य वेळी कोणती, राज्यात जी.एम.बियाणे वापरण्यासाठी परवानगी कधी मिळणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न उत्पन्न दुप्पट कधी व कसे करणार,शेतीला १२ तास वीज पुरवठा कधी करणार, शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करणार का, कांदा बटाटा जिवनावश्क वस्तु आहेत का,ठिबक सिंचनसाठी शंभर टक्के अनुदान कधी देणार, कर्जमाफीसाठी पैसे नाही सातव्या वेतन आयोगासाठी कुठून आणले, विजय मल्ल्या हजारो कोटीचे कर्ज बुडवून पळवून गेला त्याचे काय केले आदी प्रश्नांचा यात समावेश होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... रावसाहेब दानवे यांच्या आमदार पुत्रांच्या सभेत उडालेला गोंधळाचे फोटोज आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...