आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार, खासदारांच्या प्रचारसभांमुळे आली निवडणुकीत रंगत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलताना आमदार अमित देशमुख. - Divya Marathi
लातूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलताना आमदार अमित देशमुख.
लातूर - लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे प्रचारात रंगत आली आहे. गुरुवारी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी मार्केट यार्डात सभा घेतली, तर भाजप-सेनेच्या पॅनलने मार्केट यार्डातच प्रचार फेरी काढली. खासदार सुनील गायकवाडही प्रचारात उतरले असून त्यांनीही बुधवारी सभा घेतल्या.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि वैजनाथ शिंदे हे दोन माजी आमदार उमेदवार आहेत. त्यातच लातूरचे भाजप खासदार सुनील गायकवाड यांनीही पहिल्यांदाच भाजपच्या एखाद्या स्थानिक निवडणुकीत सहभाग घेतला आहे. गायकवाडांनी मार्केट यार्डात सभा घेऊन पॅनल निवडून देण्याचे आवाहन केले, तर गुरुवारी आमदार अमित देशमुखांनी सभा घेऊन भाजपच्या पॅनलवर आगपाखड केली.

अर्धे उमेदवार आमचेच
जिल्ह्यातील सहकाराच्या निवडणुकीत भाजप-सेनेला सातत्याने पराभव स्वीकारावा लागला आहे. तरीही भाजपचे पडेल नेते पुन्हा पुन्हा पॅनल उभे करून निवडणुकीची हौस भागवून घेतात. पडेल नेत्यांचे पडेल पॅनल असा उल्लेख करीत आमदार अमित देशमुख यांनी भाजपची खिल्ली उडवली. गुरुवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक कामे केली आहेत. नव्या बाजार समितीसाठी १५० एकरांच्या जागेत काम सुरू करणार आहे. गुमास्ते, हमाल यांच्यासाठी त्याच परिसरात घरकुले बांधण्यात येणार आहेत. भाजपने दिलेली सगळी आश्वासने आम्ही याअगोदरच पूर्ण केल्याचे देशमुख यांनी सांगितले. विशेष म्हणजे आमच्याकडे चारशे जणांनी उमेदवारी मागितली होती. ज्यांना ती मिळाली नाही अशातील काही नाराजांनाच भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचे अर्धे उमेदवार आमचेच आहेत, असा दावा देशमुख यांनी केला.

भाजप-सेनेची प्रचार रॅली
गेले आठ दिवस भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचाराची राळ उडवली आहे. खासदार सुनील गायकवाड यांनी मांजरा, विकास, रेणा हे कारखाने आणि जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारात हजेरी लावली नव्हती. मात्र, पहिल्यांदाच ते बाजार समितीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी गेल्या दोन दिवसांत प्रचारसभा घेऊन काँग्रेसच्या पॅनलचा पराभव करण्याचे आवाहन केले. पॅनलप्रमुख रमेश कराड, शैलेश लाहोटी आणि बळवंत जाधव यांनी गुरुवारी समितीच्या आवारात रॅली काढली. मोठ्या शक्तीनिशी त्यांनी यार्डातील व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या. गुमास्ता आणि आडत्यांना भेटून मतदानाचे आवाहन केले. या निवडणुकीत भाजपने आपली ताकद पणाला लावल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेप्रमाणेच कोणत्याही परिस्थितीत बाजार समितीत प्रवेश मिळवायचाच. कारण त्याच बळावर आमदारकी मिळवता येते, असे गणित लाहोटी आणि कराड यांनी मांडले आहे.
बातम्या आणखी आहेत...