आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत मनसे उमेदवाराचा ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - परभणी विधानसभा मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार विनोद लिंबाजीराव दुधगावकर यांनी सोमवारी (दि. १३) रात्री झालेल्या राजकीय घडामोडींतून अनपेक्षितपणे शिवसेनेत प्रवेश करीत मतदानापूर्वीच हार पत्करल्याचा प्रकार घडला. मतदानाच्या अवघ्या ३६ तासांपूर्वीच झालेला कोलांटउडीचा हा प्रकार मराठवाड्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील पहिलाच असावा.

मनसेने जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत उमेदवार दिलेले असताना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिंतूर मतदारसंघातील उमेदवार खंडेराव आघाव यांनीही पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म असताना घेतलेली माघार व त्यापाठोपाठ मतदानाला अवघे काही तास बाकी असताना दुधगावकर यांनी पत्करलेली हार जिल्ह्याच्याच नव्हे, राज्याच्या राजकीय वर्तुळात सर्वार्थाने चर्चेचा विषय ठरला आहे.

परभणी जिल्ह्यात मनसेचे अस्तित्वच फारसे नाही. पक्षाच्या असलेल्या मोजक्या कार्यकर्त्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर गटबाजी चालते. शिवसेनेत तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख अशा विविध प्रकारच्या भूमिका बजावणारे विनोद दुधगावकर हे मागील तीन वर्षांपासून मनसेत कार्यरत होते. त्यांचे संपूर्ण कुटुंबच विविध पक्षांत कार्यरत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले (कै.) लिंबाजीराव दुधगावकर यांचे ते चिरंजीव होत. या वेळी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही, या पेचात असलेल्या विनोद दुधगावकरांना मनसेने ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली. पक्ष कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रचारयंत्रणाही जोमाने राबवली. कालपर्यंत त्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी घेण्यासह मतदानाची गणितेही रंगवली होती. मात्र, सोमवारी दिवसभराच्या घडामोडींतून त्यांनी रात्री नऊच्या सुमारास अनपेक्षितरीत्या शिवसेनेत प्रवेश केला. खासदार संजय जाधव, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, विधानसभेचे उमेदवार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी खासदार संपर्क कार्यालयात शिवसेनेला आपला जाहीर पाठिंबा दर्शवत पुन्हा एकदा भगवा गळ्यात घालून घेतला.

मत विभाजन टाळण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा
परभणी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या निवडणुकीत हिंदू मतांचे विभाजन होऊ नये, एमआयएमला त्याचा फायदा होऊ नये, यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला पाठिंबा दिला.
विनोद दुधगावकर, मनसे उमेदवार