आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे घ्या दीड हजार रुपये अन् पेरणी करून दाखवा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - एका हेक्टरमध्ये दीड हजारात दुबार पेरणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिक करून दाखवावे यासाठी मनसेच्या वतीने शेतक-याच्या हस्ते बुधवारी तहसीलदारांना दीड हजार रुपये देण्यात आले. या अनोख्या गांधीगिरीने मनसेने आपला शासनाप्रति असलेला रोष व्यक्त करून शासनाने शेतक-यांना दुबार पेरणी व पहिल्या पेरणीची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी तीस हजार रुपये द्यावेत, अशी मागणी केली.

जूनमध्ये झालेल्या पहिल्या पावसाने शेतक-यांना आनंद दिला. मृगात झालेल्या पे-याला उतारा चांगला येतो म्हणून शेतक-यांनी आपल्या अडचणी अन् दु:ख बाजूला सारून प्रसंगी उसनवारी करून चाड्यावर मूठ धरली. पुढे सरी बरसतील अन् धान्याची आबादी होईल, असा त्याचा विश्वास होता; परंतु पाऊसच न पडल्याने त्यावर विरजण पडले. नजरेदेखत कोवळी रोपे करपली अन् चाड्यावर मूठ धरलेल्या हातांनीच पेरलेल्या रानावर कुळव फिरवायची वेळ त्याच्यावर आली. हाती होते नव्हते ते काळ्या आईला देऊन रिता झालेल्या बळीराजाला आता आधाराची
गरज होती.

शासनाने अशा वेळी त्याला अाधार पुरवणे गरजेचे होते. तथापि, हेक्टरी दीड हजाराची मदत जाहीर करून त्याने शेतक-याची जणू थट्टाच केली. कर्जाच्या व दुबार पेरणीच्या धास्तीने जिल्ह्यात काही शेतक-यांनी मरणाला कवटाळले, ५५ शेतक-यांनी तर जिल्हाधिका-यांकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन देऊन पेरणीच्या खर्चाच्या ताळेबंदाचे वास्तव मांडले. एक एकर सोयाबीनची पेरणी पाहता बियाणे, खत व मजुरीचा एकरी खर्च सरासरी चार हजार असून एका हेक्टरच्या पे-यासाठी दहा हजारांवर ही रक्कम जाते. असे असताना शासन शेतक-यांना हेक्टरी दीड हजाराची मदत जाहीर करते, ही शेतक-यांची शासनाने केलेली थट्टा आहे.

दीड हजारात शासनाने पेरणी करून दाखवावी व ते जमत नसेल तर जूनमध्ये केलेल्या पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये, दुबार पेरणीसाठी तेवढीच रक्कम व पेरण्यात येणा-या धान्याला उतारा येणार नसल्याने त्याचे दहा हजार अशी हेक्टरी ३० हजार रुपयांची शेतक-यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. तथापि, शेतक-यांच्या आर्त हाकेला शासनाच्या मायेचा आधार लाभेल का? याचे उत्तर शेतक-याकडे अन् आंदोलनकर्त्यांकडेही नाही.

शासन मरणाची वाट दाखवतेय
एक हेक्टर सोयाबीनची पेरणी करण्यासाठी साडेपाच हजारांचे बियाणे, सव्वातीन हजारांचे खत व साडेबाराशे रुपयांची मजुरी असा सरासरी दहा हजारांचा खर्च येतो. पाच पिढ्यांपासून शेती करतो, असे सांगणा-या मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी दीड हजारात सोयाबीनचा पेरा करून दाखवावा. हेक्टरी दीड हजाराची मदत जाहीर करून शासन शेतक-याला एक प्रकारे मरणाची वाट दाखवत आहे.
नामदेव शालिवाहन, शेतकरी, जानवळ.