आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Deputy President Shalini Thackeray Comment On Corruption At Gangapur

भ्रष्टाचारामुळे दुष्काळ; मनसेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरेंचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर- राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रातील जनतेला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. राज्यातील बहुतांश जनता शासनाच्या नाकर्तेपणामुळे पाणी, वीज व रस्ते या मूलभूत गरजांपासून वंचित असल्याचा आरोप मनसेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा येथे एका कार्यक्रमात केला.

गवळी शिवरा येथे बुधवारी दुपारी तीन वाजता शालिनी ठाकरे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, संपर्कप्रमुख सतीश नारकर, मनसे चित्रपट कर्मचारी सेनाप्रमुख अमेय खोपकर, चित्रपट अभिनेते जितेंद्र जोशी, जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर, डॉ. सुनील शिंदे, संतोष जाधव , बाबासाहेब चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी शालिनी ठाकरे म्हणाल्या की, सध्याचा दुष्काळ राज्यकर्त्यांनी जनतेवर लादला असून सिंचन योजनांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार करून त्या अर्धवट ठेवल्यामुळे जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. यापुढील काळात जनतेने राज ठाकरेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी स्थापन केलेल्या दुष्काळ निवारण समितीने या काळात अतिशय चांगले काम केले असल्याचे त्या म्हणाल्या.

गवळी शिवरा येथील कार्यक्रमात परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वह्या व गणवेशाचे वाटप करण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

या वेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी गंगापूर हा मराठवाड्यातील दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेला तालुका असल्याचे सांगितले. तालुक्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी सत्ताधारी व प्रशासकीय यंत्रणेने कुठलेही सहकार्य केले नसल्याचा आरोप करून मनसेतर्फे तालुक्यात सात टँकरद्वारे तीस ते पस्तीस गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी संपर्कप्रमुख सतीश नारकर, चित्रपट अभिनेते जितेंद्र जोशी, जि.प. सदस्य संतोष जाधव यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीविषयी मनसेची भूमिका मांडली. तालुका संघटक बाबासाहेब चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सरपंच शोभाबाई वंजारे, राजेंद्र केरे, बाबासाहेब केरे, अशोक कराळे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.