आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमेकांचे गोडवे: लातूरमध्ये मोदी-पवारांत रंगला होता भूकंपावरून कलगीतुरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व त्या वेळेसचे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यात लातूरच्या भूकंपावरून सभांमधून आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली होती. व्हॅलेंटाइनदिनी बारामतीच्या सभेत पवार-मोदींनी एकमेकांचे गोडवे गायल्यानंतर आरोपांची जुगलबंदी ऐकलेल्या लातूरकरांना जणू किल्लारीच्या भूकंपापेक्षा जास्त धक्का बसला.

तारीख होती नऊ एप्रिल २०१४... स्थळ होतं लातूरचं क्रीडा संकुल मैदान... नरेंद्र मोदी म्हणाले होते की, अलीकडे शरदराव माझी सकाळ-संध्याकाळ आठवण काढत असतात. त्यामुळे लातूरमध्ये त्यांची आठवण काढणार आहे. ते केंद्रात १० वर्षांपासून मंत्री आहेत. मात्र, त्यांच्या हातून एकही भरीव काम झालेले नाही. एवढेच नाही, तर ते मुख्यमंत्री असताना लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंप झाला होता. त्यांना या भागातील साधी घरांची उभारणीही करता आली नाही. त्याच्या दुस-याच दिवशी म्हणजे १० एप्रिल रोजी भूकंपग्रस्त औसा भागात शरद पवारांची सभा होती. त्यात त्यांनी नरेंद्र मोदींवर पलटवार केला. गुजरातचा जो काही विकास झाला तो काँग्रेसच्या काळात. मोदींच्या काळात उलट विकासदर कमी झाला. मोदींना साधा इतिहासही माहीत नाही, असे सांगतानाच पवारांनी उपहासाने लातूरच्या भूकंपग्रस्तांचे अश्रू मोदींनीच पुसल्याची टीका केली होती. एवढ्यावरच न थांबता पवारांनी मोदींच्या सभांना होणा-या गर्दीचा उल्लेख खिसा सैल सोडल्यावर कुणाच्याही सभांना गर्दी होते, असा केला होता. शनिवारी बारामतीत मोदी-पवारांनी एकमेकांचे गायलेले गोडवे ऐकताना लोकसभा निवडणूक काळात त्या दोघांत रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींचे लातूरकरांना स्मरण झाले. एकाच दिवशी चार-चार सभा घेणारे मोदी लातूरमध्ये काय बोलणार याची त्या वेळी उत्सुकता होती. लातूरचे भूमिपुत्र विलासरावांचे निधन झालेले. त्यांच्याबद्दल लातूरकरांमध्ये सकारात्मक भावना. इथले दुसरे काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर कुणाच्याही अध्यात-मध्यात नसलेले. मग मोदी कुणावर बोलणार याबाबत उत्सुकता होती.

भूकंपग्रस्तांच्या उभारणीवरून केली होती त्या वेळी टीका
मोदींनी २१ वर्षांपूर्वीच्या भूकंपाचा विषय काढून शरद पवारांवर संधान साधले. तसा पवारांचा लातूरशी फारसा संबध नाही. मात्र, पवारांनी भूकंपाच्या काळात मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केल्याचे बोलले जाते. त्यामुळे मोदींनी भूकंपग्रस्तांच्या उभारणीवरून केलेली टीका पवारांना चांगलीच झोंबली होती. शनिवारी बारामतीची सभा टीव्हीवरून लाइव्ह ऐकल्यानंतर अनेकांना मोदींच्या क्रीडा संकुलावर झालेल्या भाषणाची व त्याला पवारांनी दिलेल्या प्रत्युत्तराची आठवण झाली.