आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात मोहन भागवत करणार कोरड्या मांजरा नदीचे जलपूजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूरमध्ये टंचाई निर्माण झाल्यानंतर त्यावर मात करण्यासाठी म्हणून मांजरा नदीच्या १८ किमी पात्रातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. जिल्ह्यात इतरत्र पाऊस पडत असला तरी मांजराच्या खोऱ्यात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अद्याप पाणी आलेले नाही. तरीही जलयुक्त लातूर चळवळीच्या सदस्यांनी थेट सरसंघचालकांच्या हस्ते तेथे साचलेल्या खड्ड्यातील पाण्याचे पूजन करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे या बिनपाण्याच्या जलपूजनाची चर्चा लातूरमध्ये चांगलीच रंगली आहे.

लातूरच्या पाणीटंचाईची चर्चा यंदा दिल्लीपर्यंत गाजली. अख्ख्या देशात त्यामुळे लातूरची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना झाल्यामुळे ती सुधारण्यासाठी काय करता येईल यासाठी काही मंडळी एकत्र आली. त्यांनी मांजराच्या पात्रातील साई आणि नागझरी या उच्चस्तरीय बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा संकल्प केला. आर्ट ऑफ लिव्हिंग, जनकल्याण समितीने पुढाकार घेवून १८ किलोमीटरचे काम पूर्णत्वास नेलेे. त्यासाठी शहरातील अगदी हातगाडा चालकापासून ते शिक्षण संस्थाचालकानी योगदान देत सुमारे साडेपाच कोटींचा निधी जमवला. सध्या १८ किमी पात्रातील गाळाचा थर काढण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यातील तेरणा आणि तावरजा या नदीक्षेत्रात मोठे पाऊस पडले असले तरी मांजराचे पात्र अद्याप कोरडेच आहे. अल्पशा पावसामुळे त्या-त्या ठिकाणच्या डोहात फूट-दोन फूट पाणी साचले आहे इतकेच. मोठ्या पावसाअभावी मांजरा पट्ट्यात अद्याप पेरण्याही झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते नागझरी बंधाऱ्यात जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, पाणीच आले नाही तर पूजन कशाचे, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

मकरंद जाधव आणि त्र्यंबकदास झंवर यांनी सांगितले की, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लातूरमध्ये झालेल्या कामाची भागवत यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी ते पाहण्याची इच्छा व्यक्त केली. ते येणारच आहेत तर त्यांच्या हस्ते एखादा कार्यक्रम घ्यावा म्हणून जलपूजनाचे नियोजन केले आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, भागवत यांच्या सुरक्षेसाठी ४५३ पोलिस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.
कलशातजलपूजन : नदीमधीलखड्ड्यांत साठलेले पाणीे कलशात घेतले जाणार आहे. याच पाण्याचे पूजन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते केले जाणार आहे.

केतकरांच्या प्रकृतीची करणार विचारपूस : सुरेश केतकर... वय वर्षे ८३... मूळचे पुण्याचे.. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला आणि त्यांनी स्वत:ला संघकार्यात वाहून घेतले. प्रारंभी उपजीविकेसाठी काही नोकरी करायचे. मात्र, पुढे पूर्णवेळ प्रचारक झाल्यानंतर त्यांनी नोकरीचा त्याग केला. संघाच्या नियमाप्रमाणे ते आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांच्याकडे अखिल भारतीय स्तरावरची संघाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती. दरम्यान, वर्षे ते रुग्णशय्येवर आहेत. विविध आजारांनी ग्रासले आहे. मोहन भागवत यांना सुरेश केतकर वरिष्ठ आहेत. त्यामुळे बीडला कार्यक्रमाला आल्यानंतर भागवत यांनी मुद्दामहून लातूरला येऊन केतकरांची भेट घेण्याचा कार्यक्रम आखला.

पूजेचे नाटक कशाला?
मांजरात तीन वर्षांत पाणी आलेले नाही. काहीतरी चांगले होईल या अपेक्षेने पक्ष, संघटना, विचार बाजूला ठेवून सर्वसामान्यांनी गाळ काढण्यासाठी पैसे दिले. मात्र, मोहन भागवतांच्या हस्ते जलपूजनाचा घाट घातला गेला आहे, तरीही हरकत नाही. पण नदीत पाणीच नसताना जलपूजनाचे नाटक कशासाठी? हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. -अॅड. उदय गवारे, शेकाप नेते

प्रतीकात्मक जलपूजन
भागवत यांना मांजराच्या खोलीकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ते काम पाहण्याची उत्सुकता दाखवली. त्यांच्यासारखी व्यक्ती लातूरमध्ये आल्यानंतर त्यांच्या हस्ते एखादा कार्यक्रम व्हावा म्हणून प्रतीकात्मक जलपूजन करण्याचा निर्णय घेतला. मांजरात अद्याप पाणी नाही हे खरे असले तरी सध्या एक-दोन डोह भरले आहेत. निसर्गाने ठरवले तर एका तासात पाणी येऊ शकतेे. -डॉ.अशोक कुकडे, प्रमुख, जलयुक्त लातूर चळवळ
बातम्या आणखी आहेत...