आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय संस्कृती जगाला उन्नत करणारी: सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - जन, जल, जंगल, जीव आणि जंतूंचा स्वभाव म्हणजे संस्कृती असून भारतीय संस्कृतीमध्ये जगाला उन्नत करण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी केले.अहमदपूर येथे संतश्रेष्ठ  डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज मंदिर कळसारोहण व  डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्कृतीच्या अन्य घटकांपेक्षा माणसांचा जन्म हा इतरांपेक्षा वेगळा असल्याचे स्पष्ट करत भागवत म्हणाले, माणसाने समाजासाठी परोपकार करायला शिकले पाहिजे. 
 
स्वार्थाच्या पलीकडे जाऊन सहनशीलता कायम ठेवून काम करणे आवश्यक आहे. एकांतामध्ये आत्मसमाधान मिळते तर लोकांतात परोपकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या देशात संप्रदाय अनेक असले तरी धर्म एकच असल्याचे नमूद करत भागवत म्हणाले, अहमदपूरचे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे राष्ट्रसंत, जगद्गुरु आहेत. त्यांचे जगणे आदर्श असल्याने ते इतरांना मार्ग दाखवतात. त्यामुळे त्यांचे अनुकरण होणे गरजेचे असल्याचेही आवाहनही त्यांनी या वेळी केले. सत्काराला उत्तर देताना संतश्रेष्ठ  डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले, माझ्या सारख्या स्वंयसेवकाच्या सत्काराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांनी यावे, हे मी माझे भाग्य समजतो.
 
अलीकडील काळात राजकारणातील मंडळी निवडून आली की बाेटात अंगठ्या घालून फिरू लागली आहेत. स्वत:चे घर भरण्यापलीकडे त्यांच्याकडून काहीच मोलाचे कार्य घडत नाही. अशा प्रवृत्तीच्या लोकांवर आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींनी कोरडे ओढण्याची गरज आहे.  

आपण अखंड भारतामध्ये जन्म घेतला. आपला मृत्यूदेखील अखंड भारतात होण्याची इच्छा आहे. आपला देश, आई, वडील यांच्या सेवेसाठी जीवनाची व्यापकता वाढवण्याचेही आवाहनही महाराजांनी या वेळी केले. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी लातूरसह शेजारील जिल्ह्यातील हजारो भाविक उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...