आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Money Give Power To Ashok Chavan R.R. Patil, Divya Marathi

पैशाच्या जोरावर अशोकपर्वाची सत्ता, आर. आर. पाटील यांची अशोक चव्हाणांवर टीकेची झोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - राजकारणातून पैसा आणि पैशातून सत्ताप्राप्ती या सूत्राचा वापर करून अशोकपर्वाने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सत्ता मिळवली. त्याच सूत्राचा वापर करून ते राजकारण विकत घेण्यास निघालेत, अशी घणाघाती टीका माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी उमरी येथील जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर केली.

पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण हे निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत, अशी टीका करणारे नारायण राणे आता त्यांचाच प्रचार करीत आहेत. मोदींवर टीका करताना ते म्हणाले, मोदी राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पळवून राज्याला कमकुवत बनवत आहेत. गोपीनाथ मुंडे असते तर मला प्रचाराला येण्याची गरज नसती, असे ते म्हणत आहेत. एवढा पुळका असूनही त्यांच्या अंत्यसंस्काराला ते मात्र आले नाहीत, अशीही टीका आर. आर. पाटील यांनी केली.

हि-यांचा व्यापार सुरतला गेला- अजित पवार
मुंबई शहर हि-यांच्या व्यापारपेठेसाठी प्रसिद्ध होते. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तो हि-यांचा बाजार सुरतला हलवण्यात आला, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. मंगळवारी किल्लारी येथे राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

भाजपत केवळ जातीयवादी लोक : पृथ्वीराज चव्हाण
प्रतिनिधी | अंबाजोगाई
महाराष्ट्राचे लोकनेते विलासराव देशमुख यांचे निधन झाल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बाभळगावात जाऊन आदरांजली अर्पण केली. मात्र, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले नाहीत, भाजपत केवळ जातीयवादी लोक आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी अंबाजोगाईत केला.

चव्हाण म्हणाले, भाजपकडे नेतृत्व नसल्यामुळे मोदींना महाराष्ट्रात यावे लागते. पंधरा वर्षांत आघाडी सरकारने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढे आणण्याचे काम केले. १०५ हुतात्म्यांमुळे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. आगामी काळात सिंचनाचे क्षेत्र वाढीसाठी दहा हजार साखळी बंधारे आणि एक लाख शेततळी बनवण्याचा मानस आहे.

पंधरा वर्षांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून राज्यकारभार केला. मात्र, आघाडीत काँग्रेस पदाधिका-यांना िजल्हास्तरावर संधी मिळत नव्हती. राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला ! आता सर्वच पक्ष स्वबळावर लढत असल्याने काँग्रेस पदाधिका-यांना नव्याने संधी मिळाली आहे, असेही ते म्हणाले.
मोदी भाजपचे नाही, देशाचे पंतप्रधान : उद्धव ठाकरे
प्रतिनिधी | जालना
मोदी देशाचे पंतप्रधान असतानाही भाजपला सत्ता द्या म्हणत राज्यात फिरत आहेत, मोदी भाजपचे नाही, तर देशाचे पंतप्रधान आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. परतूर येथे मंगळवारी जाहीर सभेत ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, तिकडे सीमेवर पाकिस्तानचे सैनिक गोळीबार करत आहेत आणि देशाच्या सीमा उघड्या ठेवून मोदी आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ राज्यात फिरत आहेत. दिल्लीत सत्ता मिळाल्यानंतर भाजपने राज्यातील सेनेसोबतची युती तोडून पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्र तोडणारे आहेत, तर दुसरीकडे राज्य लुटणारे आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रवादीवर टीका केली. कितीही शाह आले, तरी महाराष्ट्राला फरक पडत नाही. महाराष्ट्र मोगल,
औरंगजेब अशा सर्वांनाच पुरून उरला आहे, या शब्दांत ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर तोफ डागली. दरम्यान, परतूरच्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील तीर्थपुरी येथेही सभा घेतली.
भीतीपोटी विरोधकांची मोदींवर टीका : राजनाथसिंह
प्रतिनिधी | लातूर
पंतप्रधानांनी लष्कराला पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहे. भारतीयांनी सुरक्षेविषयी अजिबात काळजी करू नये. मोदी प्रचारात आल्यास आपल्या जागा जातील या भीतीपोटी विरोधक फक्त त्यांच्यावरच टीका करीत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी औसा येथे केला.

लातूर ग्रामीण मतदारसंघातल्या ममदापूर येथेही त्यांची सभा झाली. ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पंधरा वर्षांत महाराष्ट्राला भ्रष्टाचार, गुंडगिरीशिवाय काहीही दिले नाही. महाराष्ट्र भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवला आहे. महाराष्ट्रातील जनता भीतीच्या सावटाखाली आहे. भाजपचे सरकार आल्यास जनतेला विकास म्हणजे काय असतो हे दाखवून देऊ. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाची मान जगात उंचावली आहे. जी अमेरिका मोदींना व्हिसा नाकारत होती तीच अमेरिका त्यांच्यासाठी पायघड्या घालताना दिसली. मोदींच्या माध्यमातून एक सशक्त सरकार देशाला मिळाले आहे. त्यामुळे राज्यालाही त्याच विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने भाजपच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे
आवाहन राजनाथसिंह यांनी केले.