आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याजाच्या पैशांसाठी बीडमध्ये कुटुंबाला डांबले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - नऊ महिन्यांपूर्वी व्याजाने दिलेल्या पैशांची परतफेड न केल्याने शेतकर्‍याचा अर्धा फ्लॅट बळकावत त्याच्या कुटुंबातील सात जणांना डांबून ठेवल्याचा प्रकार शुक्रवारी तिरुपती कॉलनीत उघडकीस आला. पोलिस उपअधीक्षक दगडू माळी यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने कुटुंबाची सुटका केली.

शहरातील पांगरी रोडवरील तिरुपती कॉलनीतील पांडुरंग चव्हाण यांची पत्नी शोभा यांनी मुलगा अभिजित याच्या आजारपणाचा खर्च भागवण्यासाठी कबाडगल्ली येथील सावकार शंकर लक्ष्मण कुरळे याच्याकडून दोन लाख रुपये, एक हजार रुपये रोज व्याज याप्रमाणे घेतले होते. पैशांची परतफेड करणे शक्य झाले नसल्याने सावकार कुरळे याने गुरुवारी रात्री पांडुरंग चव्हाण पत्नी शोभा, मुलगा अभिषेक, पृथ्वीराज, मुलगी अभिलाषा, आई गोदावरी चव्हाण, पांडुरंग यांची गतिमंद बहीण पद्मिनबाई चव्हाण असे सात जण दुसर्‍या मजल्यावरील घरात झोपले असताना गेटला शंकर कुरळे याने कुलूप लावून त्यांना डांबले. दरम्यान, सकाळी सावकार शंकर कुरळे, त्याची पत्नी मंगल या दोघांना आवाज देऊन कुलूप उघडण्यास सांगितले. तेव्हा शंकरसह गोरख लक्ष्मण कुरळे, त्याची पत्नी मीरा कुरळे हे ‘कुलूप उघडणार नाही’ असे धमकावत निघून गेले.

पोलिसांकडून सुटका
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर प्रा सुशीला मोराळे व अँड. संगीता धसे यांच्या मदतीने पोलिस उपअधीक्षक दगडू माळी यांनी तिरुपती कॉलनीत धाव घेतली. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कुरळे याच्याकडून चाव्या घेऊन कुलूप उघडून सात जणांनी सुटका केली. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.