नांदेड- नांदेड शहर व जिल्ह्यात रविवारी रात्री पावसाचे दमदार पुनरागमन झाले. सुमारे तासभर शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. लोहा, कंधार तालुक्यांसह जिल्ह्याच्या अन्य भागांतही जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
मागील जवळपास दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. वातावरणातील उकाडाही कमी होत नव्हता. आभाळ भरून यायचे. मात्र, जोरदार वारे यायचे त्यामुळे पाऊस काही पडत नव्हता. रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागली.दरम्यान, जिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वा. संपलेल्या २४ तासांत सरासरी ११.१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जालन्यात भुरभुर...
जालना- रविवारी शहरात भुरभुर, तर दानापूर परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आहे. परंतु जोरदार पाऊस होत नसल्यामुळे आभाळाकडे नजरा लागल्या आहेत.
हिंगोलीत दमदार पाऊस कोसळला
हिंगोली- जिल्हाभरात रविवारी सायंकाळनंतर बहुतांश भागात दमदार पाऊस कोसळला. या पावसामुळे लहान-मोठ्या नदी-नाल्यांना चांगले पाणी आले. हिंगोली, सेनगाव या दोन तालुक्यांत पावसाचा जोर जास्त होता. कळमनुरी, वसमत आणि औंढा नागनाथ या तालुक्यांतही सुमारे तासभर संततधार होती. २० दिवसांनंतर सर्वदूर झालेला हा सर्वात मोठा पाऊस आहे.
उस्मानाबाद : महिन्याच्या विश्रांतीनंतर पाऊस
उस्मानाबाद- शहरासह जिल्ह्यात सुमारे एक महिन्याच्या विश्रांतीनंतर रविवारी पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. यामुळे माना टाकणाऱ्या पिकांना जीवदान मिळण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
जूनच्या सुरुवातीला जोरदार पाऊस पडल्यामुळे पहिल्या आठवड्यापासून पेरणीला जिल्ह्यात सुरुवात झाली होती. प्रामुख्याने सोयाबीन, उडीद, मूग, तुरीची चांगली पेरणी झाली आहे. पहिल्या १५ दिवसांत जिल्ह्यात ७० ते ८० टक्के पेरण्या झाल्या. मात्र, त्याचदरम्यान पावसाने ओढ देण्यास सुरुवात केली. यामुळे सर्वच पिकांवर संक्रांत आली होती. काही ठिकाणी दुबार पेरण्यांचे संकट उभे राहिले होते. मात्र, रविवारी आलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद येथे दुपारी दीडपासून पावसाला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत अधूनमधून विश्रांती घेत पाऊस बरसत होता. परंडा, वाशी शहरांसह तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. तुळजापूरसह तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आला. तसेच भूम, लोहारा, उमरगा, कळंब तालुक्यातील अनेक गावांमध्ये सायंकाळपर्यंत पाऊस सुरू होता.