आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • More Female Infanticide Taking Place At Borders Of Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीमाभाग बनतोय स्‍त्री गर्भपाताचा अड्डा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- जिल्ह्यात गर्भलिंगनिदान चाचण्या व स्त्री भ्रूणहत्या होत नसल्या तरी इच्छुकांसाठी सीमावर्ती शहरांमध्ये अशा सेवांचा सुकाळ आहे. जरासा पैसा मोजला की, कर्नाटकातील डॉक्टर हे काम फत्ते करीत आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांचे त्यांच्याशी आर्थिक लागेबांधे आहेत. बीड जिल्ह्यातील स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणानंतर असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे. विशेष पथकाकरवी दवाखान्यांच्या तपासण्या होत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील सोनोग्राफी सेंटर व डॉक्टरांनी चांगलाच धसका घेतला आहे. मात्र, त्यातून मिळणा-या पैशांना आवरता येत नसल्याने अवैध कामासाठी त्यांनी कर्नाटकातील डॉक्टरांशी हातमिळवणी केली आहे. लातूर जिल्ह्याला कर्नाटक व आंध्र प्रदेशाची सीमा आहे. बिदर, भालकी, कमालनगर या शहरांत जिल्ह्यातील नागरिकांची ये-जा असते. तेथील सोनोग्राफी सेंटर, नर्सिंग होममध्ये सर्रास लिंगनिदान होते. स्त्रीभ्रूण असेल तर बिनबोभाट गर्भपात केला जातो.
असा चालतो प्रकार : उपचारांसाठी येणा-या महिलेची माहिती येथील डॉक्टर कर्नाटकातील डॉक्टरांना देतात. महिला रुग्णालयात आल्यास तिच्यासोबत आलेल्या व्यक्तीशी डॉक्टर चर्चा करतात. गर्भ लिंगनिदान करावयाचे असेल तर पाच ते 8 हजार व स्त्रीभ्रूण असल्यामुळे गर्भपात करावयाचा असेल तर 15 हजार रुपये जमा करण्यास सांगितले जाते. तत्पूर्वी संबंधित महिलेकडून आधीच भरलेल्या एका अर्जावर सही अथवा अंगठा घेतला जातो. गर्भ मातेच्या जीवासाठी धोकादायक असल्याने गर्भपात करण्यात आल्याची माहिती डॉक्टर फॉर्मवर लिहितात. त्यापूर्वीच गर्भपात आटोपलेला असतो.
गर्भपातासाठी पॅकेज ! : लिंगनिदान करून गर्भपात करण्यासाठी बिदरमधील डॉक्टरांनी पॅकेजची सुविधा सुरू केली आहे. 10 दिवसांच्या पॅकेजमध्ये हॉटलमध्ये राहणे व भोजनाची सोय केली जाते. स्वत: नातेवाइकांनी अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी व हेच काम रुग्णालयाकरवी करण्यासाठी वेगवेगळे दर आहेत.
विकृत जाहिराती : या व्यवसायातील मिळकत पाहून कर्नाटकातील अनेक डॉक्टरांनी खास माणसेही नेमली आहेत. भविष्यात मुलीच्या लग्नाचे पाच लाख अन् हुंडा वाचवायचा असेल तर आज फक्त 15 हजार द्या, अन् आयुष्यभर चिंतामुक्त राहा अशी विकृत जाहिरात हे एजंट करतात.

गांभीर्याने लक्ष घालणार
बिदर जिल्ह्यात सर्व दवाखान्यावर आमचे लक्ष आहे. लिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्या होऊ नये, यासाठी तपासणी पथके नेमली असून बाळंतपणाच्या नोंदी घेतल्या जात आहेत. एखादे मूल मेले तर त्याच्या मृत्यूचे कारणही आम्ही जाणून घेतो. बिदर, कमालनगर येथील काही दवाखान्यात लातूर जिल्ह्यातील महिला गर्भलिंग निदान व गर्भपातासाठी येतात असे कळाले आहे. मात्र, याची कागदोपत्री नोंद नसते. हे दवाखाने शोधण्यासाठी आम्ही गांभीर्याने लक्ष घालत आहोत. एखाद्या दवाखान्यामध्ये असे प्रकार होत असतील तर त्यांनी बिदर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
समीर शुक्ला, जिल्हाधिकारी, बिदर.
संयुक्त पथक
लातूर । सीमाभागात गर्भपात करण्याच्या घटना वाढत असून त्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकाचे संयुक्त पथक गठित करण्यात येणार आहे. त्याला राज्याच्या मुख्य सचिवांनी मान्यता दिली आहे. या पथकाची नजर कर्नाटकातील सोनोग्राफी केंद्र व रुग्णालयावर असेल.
डॉ. विपिन शर्मा, जिल्हाधिकारी लातूर