आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंदेवाडीच्या चारा नमुन्यात प्रमाणापेक्षा अधिक विषारी हायड्रोसायनिक अॅसिड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- विषबाधा झाल्याने इंदेवाडी येथील १८ गायी दगावल्याचा प्रकार ११ नोव्हेंबर रोजी घडला होता. हे नेमके कशामुळे घडले याचा शोध पोलिस व पशुसंवर्धन विभाग घेत आहे. त्यासाठी व्हिसेरा व चाऱ्याचे नमुने वेगवेगळ्या प्रयोगशाळांत पाठविण्यात आले होते. त्यातील चारा नमुन्याच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून आठपैकी सहा चारा नमुन्यांत प्रमाणापेक्षा अधिक ‘हायड्रासायनिक अॅसिड’ असल्याचे आढळून आले आहे. "दिव्य मराठी'ने १२ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केलेल्या वृत्तात ही शक्यता व्यक्त केली होती. अहवालामुळे यावर शिक्कामोर्तब झाले.   


शहरापासून जवळच असलेल्या इंदेवाडी येथील मारुती मंदिर देवस्थानकडे ३५ गायी होत्या त्यातील १८ गायी ११ नाेव्हेंबर रोजी पहाटे अचानक दगावल्या होत्या तर अत्यवस्थ असलेल्या ७ गायींना पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपचार करून वाचवले होते. त्यानंतर उर्वरित सर्व १७ गायी जालना शहरातील पांजरपोळ गोरक्षण केंद्रात हलविण्यात आल्या. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा अारोप करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे याप्रकरणात तालुका जालना पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुुरू केला. त्याचाच एक भाग म्हणून मृत गायींच्या व्हिसेराचे व गायी चरत असलेल्या शेतांमधील चाऱ्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या औंध (पुणे) येथील प्रयोगशाळेने चारा नमुन्यांचा अहवाल  येथील पशुसंवर्धन विभागाला पाठवला आहे. त्यात आठपैकी सहा चारा नमुन्यांत ‘हायड्रोसायनिक अॅसिड’ या घातक रासायनिक घटकाचे प्रमाण ‘अधिक तीन’ इतके आढळून आले आहे. तर उर्वरित दोन नमुन्यांपैकी एका नमुन्यात हे प्रमाण ‘अधिक १’ व दुसऱ्या एका नमुन्यात हे प्रमाण अजिबात आढळून आले नाही. कमी वाढ झालेल्या ज्वारीत या रासायनिक पदार्थाचे अंश आढळून येतात. जनावरांनी ते खाल्ले तर त्यांना विषबाधा होण्याचा धोका असताे, असा निष्कर्षही या अहवालात नोंदवण्यात आला आहे.


व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा  
पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळेने चारा नमुन्यांचा अहवाल दिला असला तरी अद्याप औरंगाबाद येथील न्याय वैधक प्रयोगशाळेकडून ‘व्हिसेरा’चा अहवाल मिळालेला नाही. व्हिसेराच्या अहवालानंतरच गायी दगावण्याचे कारण समोर येईल. मात्र चारा नमुन्यांत हायड्रासायनिक अॅसिडचे अंश प्रमाणापेक्षा अधिक अाढळल्याने वनस्पतीमधून विषबाधा झाल्याचे समोर येत आहे.  

 

काय आहे ‘अधिक तीन’ प्रमाण  

 

चारा नमुन्यांमध्ये रासायनिक पदार्थांचा अंश ० ते ५ या प्रमाणात ठरवला जातो. त्यामुळे रासायनिक घटकांचा अंश त्यात नसेलच तर ‘निगेटिव्ह’ अत्यंत कमी प्रमाणात असल्यास १ आणि अधिक प्रमाणात असेल तर अधिक ५ असे संबोधले जाते. 
पशुसंवर्धन विभागाला मिळालेल्या अहवालानुसार आठ पैकी सहा नमुन्यांत हे प्रमाण अधिक तीन आढळले असून ते धोकादायक आहे.  

 

 

अशी दिसतात लक्षणे  

- अती लाळ गाळणे
- डोळ्यात पाणी येते
- सतत लघवी व शेण टाकणे
-बुबळांचा आकार वाढणे
- स्नायूंचा कंप होऊन स्नायू आकुंचन पावणे
- पोट फुगणे, हृदयाचे ठोके वाढणे ही लक्षणे दिसतात

 

> इंदेवाडीत दगावलेल्या गायींमध्ये हीच लक्षणे दिसून आली होती. त्यातच आता चारा नमुन्यांत याचे घातक प्रमाण आढळले आहे. मात्र न्यायवैद्यकच्या अहवालावरच गायी दगावल्याचे अधिक स्पष्ट होईल, असे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

सहा नमुन्यांत हायड्राेसायनिक अॅसिड

पुण्याच्या प्रयोगशाळेत ८ नमुने तपासणीसाठी पाठवले. ६नमुन्यांत हायड्रोसायनिक अॅसिडचे प्रमाण अधिक असल्याचा अहवाल आला. त्याची कारणेही अहवालात नमूद आहे. त्यानुसार ज्वारीसारख्या वनस्पतींमध्ये ते तयार होते असे म्हटले आहे. अहवाल अद्याप मिळालेला नाही. 
- डॉ. एस.के.कुरेवाड, पशुसंवर्धन उपायुक्त, जालना.

 

असे तयार होते अॅसिड  
कमी वाढ झालेल्या ज्वारीत हायड्रोसायनिक अॅसिड होते. थंडीच्या व पानगळीच्या दिवसांत याचे प्रमाण पिकात व वनस्पतीत वाढते. ज्या जमिनीत नायट्रोजनचे प्रमाण अधिक व फॉस्फरसचे कमी त्या जमिनीतील पिकांत सायनोजेनिक ग्लायकोसाईडचे प्रमाण अधिक असते. बिटा ग्लायकोसाईड विकराची सायनोजेनिक ग्लायकोसाईडसोबत प्रक्रिया होते. त्यामुळे वनस्पतीत हायड्राेसायनिक अॅसिड हा विषारी घटक तयार होतो.

 

 

बातम्या आणखी आहेत...