आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांना फेकून आईचीही तिसर्‍या मजल्यावरून उडी! मुले दगावली, आई गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - अपंग व मतिमंद मुलांच्या भविष्याने ग्रासलेल्या आईने आपल्या दोन मुलांसह तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही मुले दगवाली, तर आई गंभीर जखमी झाली. हा प्रकार येथील शासकीय वसाहतीत बुधवारी सकाळी 10 वाजता घडला.
सोनाली (10 वर्षे), गणेश (नऊ महिने) अशी मृत मुलांची नावे आहेत, तर आई वैशाली तुकाराम मुडे गंभीर जखमी आहे. अहमदपूर येथील तुकाराम मुडे लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पेशकार म्हणून कार्यरत आहेत. ते पाच वर्षांपासून पत्नी, दोन मुली व एका मुलासह राहतात. त्यांची मोठी मुलगी सोनाली (10) ही अपंग व मतिमंद तर नऊ महिन्यांचा गणेश हा मुलगाही मतिमंदच होता. मधली मुलगी मई (6 वर्षे) ही येथील ज्ञानप्रकाश विद्यालयात पहिलीत शिकते. मुडे यांच्या पत्नी वैशाली (40) या घरकाम करून दोन्ही मतिमंद मुलांची देखभाल करायच्या.
बुधवारी सकाळी दहा वाजता तुकाराम मुडे हे कार्यालयात आले. त्यानंतर वैशाली यांनी घराला कुलूप लावून सोनाली व गणेश या मुलांना घेऊन तिसर्‍या मजल्यावर गेल्या. त्यांनतर त्यांनी अंदाजे 45 फुटांवरून एकेक करून दोन्ही मुलांना फेकून दिले आणि त्यांनी स्वत:ही उडी मारली. शेजार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ येथील जिल्हा रुग्णालयात तिघांनाही दाखल केले. सोनालीच्या ओठास गंभीर मार लागला, तर पोटात रक्तस्राव झाला होता. गणेशच्या डोक्याला मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली, परंतु उपचार चालू असताना या बालकांनी प्राण सोडले.
मुलांमुळे वैशाली एकलकोंडी
वैशाली या शेजार्‍यांत फारशा रमायच्या नाहीत. बाजूच्या घरांतही त्या कधी जात नसत. मतिमंद मुलगी सोनालीला घराशेजारील संवेदना या शाळेत सोडण्यासाठी आणि घरातील कचरा बाहेर टाकण्यासाठीच त्या बाहेर यायच्या. एरवी त्यांचे घर मधून बंदच असे. कधी त्या बोलल्या तर त्यातून मुलांच्या भविष्याची चिंता जाणवत होती, असे शेजार्‍यांनी सांगितले.
मईचे नशीब बलवत्तर : मुडे यांची मधली मुलगी मई ही बुधवारी शाळेत जाण्यास नकार देत होती, परंतु तुकाराम मुडे यांनी तिला शाळेत नेवून सोडले. मई जर घरात राहिली असती तर कदाचित तिलाही आईने दोन्ही भावंडांसारखेच फेकून दिले असते, अशी चर्चा होती.
कालच घेतला डॉक्टरांचा सल्ला
मुडे यांचा नऊ महिन्यांचा मुलगा गणेशला मंगळवारी येथील एका डॉक्टरांकडे नेण्यात आले होते. डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवा, इतकेच सांगून त्याच्या मतिमंदावर फारसे समाधनकारक उपाय सांगितले नव्हते. त्यामुळे वैशाली यांना नैराश्य आले असावे आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
आई गंभीर : वैशाली यांना दोन्ही पाय, मणके, गुडघे आदी सात ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. त्यांचा कंबरेपासूनचा खालील भाग निकामीच झाला आहे. त्या पूर्ण शुद्धीवर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर डॉ. अविनाश कावळे यांनी दिली.