आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक दिवसाच्या मुलीला पायरीवर सोडून माता पसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर खोटे नाव व पत्ता नोंदवत एक दिवसाच्या मुलीला रुग्णालयाच्या पायऱ्यांवर बेवारस सोडून माता पसार झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. सापडलेल्या चिमुकलीवर रुग्णालयातील नवजात अर्भक अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. उपचार पूर्ण झाल्यानंतर मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर केले जाणार आहे. स्त्री भ्रूणहत्येच्या बाबतीत बीडमध्ये नकोशीची मानसिकता अजूनही कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

बुधवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातील पुरुष वैद्यकीय विभागाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर एक चिमुकली असल्याचे रुग्णालय कर्मचारी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मुलीला ताब्यात घेत नवजात अर्भक अतिदक्षता विभागात दाखल केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, बेटी बचाओ समितीचे जिल्हा सदस्य तत्त्वशील कांबळे, बेटी बचाओ समितीचे तालुका सदस्य अशोक तांगडे यांनी मुलीची पाहणी केली. पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. रुग्णालय कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मातेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण ती सापडलीच नाही.

मुलीला बालकल्याण समितीसमोर नेणार : उपचार पूर्ण झाल्यानंतर मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर केले जाईल. बालकल्याण समितीच्या आदेशानुसार मुलीला शिशुगृहात पाठवण्यात येईल. - अशोक तांगडे, तालुका सदस्य, बेटी बचाओ समिती

ती माता सीसीटीव्हीत कैद? : मुलीला पायऱ्यांवर सोडून पसार होणारी माता रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...