आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाचे अपहरण झाल्याने आईची आत्महत्या, ऊस तोडीच्या पैशावरून मुकादमाचे अपहरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - मुखेड तालुक्यातील सावरगाव फकरू तांडा येथे ऊसतोडीचे पैसे दिले नाही म्हणून उमाकांत जाधव या मुकादमाचे एक महिन्यापूर्वी अपहरण करण्यात आले. या धक्क्याने त्याच्या आईने पंधरा दिवसांपूर्वी विष प्राशन केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी ती मरण पावली. या प्रकरणी मुखेड पोलिसांत 10 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कळंब तालुक्यातील हावरगा येथे संभू महादेव साखर कारखान्यावर लक्ष्मण पिराजी इरेवाड यांचा ट्रक होता. या ट्रकवर सावरगाव फकरू तांडा येथील ऊसतोड कामगार होते. ऊसतोड कामगारांना कारखान्याने 3 लाख 60 हजार रुपये देण्याचे कबूल केले. परंतु प्रत्यक्षात मात्र ऊसतोडीचे कारखान्याने केवळ दीड लाख रुपयेच मुकादम उमाकांत जाधव याला दिले.
ट्रक मालक लक्ष्मण इरेवाड पैशासाठी जाधव याच्या मागे लागला होता. कारखान्याने पूर्ण पैसे दिले नसल्याने त्याने वारंवार सांगितले. त्यावर त्याचा विश्वास बसला नसल्याने 27 जून रोजी सकाळी 11 वाजता लक्ष्मण इरेवाड व त्याच्या इतर 9 साथीदारांनी उमाकांत जाधवचे अपहरण केले. त्याला प्रथम मुखेड येथे आणून मारहाण केली. त्यानंतर त्याला कारखान्यावर डांबून ठेवले. या घटनेने धक्का बसल्याने उमाकांतची आई जिजाबाई विजय जाधव (42) हिने पंधरा दिवसांपूर्वी विष प्राशन केले. तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी ती मरण पावली. या प्रकरणी उमाकांतचा भाऊ संदीप विजय जाधव (22) याने दिलेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला.