आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॉटोरिक्षा - दुचाकीचा अपघात; दोन जागीच ठार,तीन जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी  - जिंतूर तालुक्यातील शेवडी शिवारामध्ये प्रवासी वाहतूक करणारा अॉटोरिक्षा व मोटरसायकल यांच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (ता.२४) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जिंतूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्ञानोपासक महाविद्यालयासमोरील येलदरी रस्त्यावर घडली. मोटारसायकलवरील वासुदेव चव्हाण व विजय राठोड या दोघांचा मृतांत समावेश आहे.   

तालुक्यातील येनोली तांडा येथे महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त  कुऱ्हाडी येथील वासुदेव अमरसिंह चव्हाण (३५) हे आपल्या कुटुंबीयांसमवेत येनोली येथील यात्रेला आले होते. कुटुंबातील सदस्यांना  येनोली येथेच ठेवून रात्री उशिरा ते विजय धर्मा राठोड, रमेश बाबूलाल चव्हाण (दोघेही रा. गणेशनगर, सावळी) यांना सोबत घेऊन विनानंबरच्या यामाहा कंपनीच्या मोटारसायकलवरून ट्रिपल सीट जिंतूरकडे येत होते.
 
प्रवीण संपत आढे, संपत हरिदास आढे हे दोघे (रा. येनोली तांडा) हे दिवसभराचे  काम आटोपून येनोलीकडे अॉटोरिक्षाद्वारे परत जात होते. रस्त्यात ज्ञानोपासक महाविद्यालयासमोरील रस्त्यावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यात मोटारसायकलवरील वासुदेव चव्हाण व विजय राठोड हे दोघेजण जागीच ठार झाले.
 
 रमेश चव्हाण, प्रवीण आढे, संपत आढे हे तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच सहायक पोलिस निरीक्षक सय्यद इमाम यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी  पाठवण्यात आले.
 
बातम्या आणखी आहेत...