आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात उद्योग टिकवण्यासाठी धडपड; मजुरांचे झाले स्थलांतर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - सलग ४ वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत येथील उद्योजक कारखाने चालवण्याची कसरत करत आहेत. चालू वर्षातसुद्धा दुष्काळाचे सावट असल्याने अर्ध्याहून अधिक कारखाने बंद पडले आहेत. सद्य:स्थितीत ४२ स्टील कारखान्यांपैकी केवळ ७-८ कारखानेच तग धरून आहेत. याचा फटका मजुरांनासुद्धा बसला असून २५ हजार लोकांना रोजगार देणारी जालना एमआयडीसी फक्त ५ हजारांवर आली आहे. यातच ग्रामीण भागात काम मिळत नसल्याने मजूर शहराकडे धाव घेत आहेत. यात सर्वाधिक मजूर बांधकामावर आहेत.

वर्ष १९९१ ते २०१० या दोन दशकांत जालना एमआयडीसीचा विस्तार उत्तरोत्तर वाढत गेला. उद्योगांच्या प्रगतीमुळे जुनी एमआयडीसी, टप्पा १, टप्पा २ व आता टप्पा ३ अशी एमआयडीसी क्षेत्रात वाढ होत गेली. मात्र, मागील चार वर्षांपासून जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असून याची सर्वच क्षेत्रांना झळ पोहोचली आहे. स्टील व बियाणे कंपन्यांमुळे जालना एमआयडीसीची ख्याती राज्यासह देश-परदेशात पोहोचली. मात्र, दुष्काळाने सर्वच उद्योगांना घेरले आहे.

कारखाने बंद पडल्यामुळे मजुरांना इतरत्र स्थलांतर करावे लागत आहे. ग्रामीण भागात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे मिळण्यात शासकीय लालफितीचा अडसर असल्यामुळे मजुरांनी शहराचा रस्ता धरला आहे. मात्र, शहरातसुद्धा कारखान्यांमध्ये काम िमळत नसल्यामुळे हाती थापी अन् फावडे घेऊन इमारतीच्या बांधकामावर जुंपण्याची वेळ ग्रामीण मजुरांवर आली आहे.

५० हून अधिक बांधकामे सुरू
जालना शहरात शासकीय-निमशासकीय तसेच खासगी ५० हून अधिक इमारतींची बांधकामे सुरू आहेत. या ठिकाणी दीड-दोन हजार मजूर काम करत आहेत. यात महिलांची उपस्थितीसुद्धा लक्षणीय आहे. बांधकामावरील गवंड्याला ५००-७०० रुपये तर मजुराला ३००-४०० रुपये रोजंदारी मिळते. एकंदर बांधकाम व्यवसायावर २ हजार कुटुंबे अवलंबून आहेत.

मग्रारोहयाेची कामे
जिल्ह्यात मग्रारोहयोची ५०१ कामे सुरू असून २ हजार ११८ मजुरांची दैनंदिन उपस्थिती आहे. मागील आठवड्यात १२ हजार ६९८ मजूर कामावर असल्याचे साप्ताहिक अहवालात नमूद आहे. यात ग्रामपंचायत स्तरावर १७४ तर तहसील स्तरावर ३२७ कामे सुरू आहेत. चालू वर्षात एप्रिल ते जून २०१५ अखेर १३ कोटी ७३ लाख ५० हजार अकुशल, तर १० कोटी ८७ लाख २९ हजार रुपये कुशल कामांवर खर्च झाले आहेत. एकूण २४ कोटी ६० लाख ७९ हजार रुपये मग्रारोहयोच्या कामांवर
खर्च झाले आहेत.

एमआयडीसीतील उद्योगांचे वास्तव
जालना एमआयडीसीत ३० मोठे व १२ छोटे स्टील कारखाने आहेत. मात्र, दुष्काळामुळे निर्माण झालेले मंदीचे सावट, उत्पादित मालाची विक्री मंदावणे, वीज बिलातील वाढ, पाणीटंचाई, भावात झालेली घसरण यामुळे कारखाने बंद होऊ लागले आहेत. सद्य:स्थितीत छोटे- मोठे फक्त ७-८ स्टील कारखाने सुरू आहेत. अशीच स्थिती कमी-अधिक प्रमाणात अन्य उद्योगांचीसुद्धा आहे.

जालना जिल्ह्यातील कामगारांची स्थिती
जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाकडे बांधकाम कामगार १० हजार, घरेलू कामगार ४, तर मोंढ्यात काम करणारे १६०० हमाल-माथाडी कामगार आहेत, असे कामगार अधिकारी काळे म्हणाले. तर याहून मोठा आकडा असंघटित क्षेत्रातील मजुरांचा असल्याचे अण्णा सावंत यांनी सांगितले.

कामांची मागणी करणार
^दुष्काळी स्थितीमुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण व शहरातील मजुरांना कामाची गरज आहे. मजुरांवर स्थलांतराची वेळ येऊ नये यासाठी मग्रारोहयोअंतर्गत रस्ते, रोपवाटिका, सिंचनाची कामे हाती घ्यावीत, यासाठी जिल्हाधिका-यांकडे मागणी करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत मजुरांना गावातच काम मिळायला हवे. जिल्ह्यात एकट्या शेतमजुरांची संख्या पावणेदाेन लाख आहे.
अण्णा सावंत, कामगार नेते, जालना

घरकुलांचा आधार
इंदिरा आवास योजना, रमाई आवास व राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.१ या अंतर्गत जिल्ह्यात ५८१९ घरकुलांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी कुशल व अकुशल २३ हजार ४८४ मजूर काम करत आहेत. यासोबतच स्वच्छतागृहाचीसुद्धा कामे सुरू आहेत. यामुळे घरकुल लाभार्थीस हक्काची मजुरी मिळाली आहे.
सचिन सूर्यवंशी, सहायक प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जालना

राेजगारासाठी स्थलांतर
दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात कामे उपलब्ध नाहीत. यामुळे कुटुंबासह शहरात आलो आहे. दोन महिन्यांपासून महिला व बाल रुग्णालयाच्या इमारतीच्या कामावर आहे. यापूर्वी मी शेती करत होतो, मात्र दुष्काळामुळे शेतात काम नसल्याने रोजगारासाठी स्थलांतर केले.
जीवनसिंह चव्हाण, रा.राणी उंचेगाव, ता.घनसावंगी

मागेल त्याला काम द्या
गावागावांत मागेल त्याला कामे देण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना केलेल्या आहेत. जर कुठे कामाची मागणी असतानासुद्धा काम उपलब्ध करून दिले जात नसेल, तर संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल. येत्या मंगळवारी मग्रारोहयोचा आढावा घेतला जाईल.
ए.एस.आर. नायक, जिल्हाधिकारी, जालना

मोजकेच मजूर कामावर
सध्या कामावर गरजेनुसार मोजकेच मजूर आहेत. दुष्काळी परिस्थिती, वीजदरातील वाढ, उत्पादित मालास अल्पशी मागणी यामुळे कारखानदार अडचणीत आहेत. मात्र, येत्या काळात परिस्थिती बदलेल व उद्योग पुन्हा पूर्ण क्षमतेने चालतील, या आशेवर उद्योग चालवत आहोत. -घनश्याम गोयल, संचालक, कालिका स्टील, जालना