आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेच्या वेळेनुसार बस सोडा, 40 विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- शाळेच्या वेळेनुसार चऱ्हाटा येथे जाण्यासाठी बस सोडली जात नसल्याने  बीड आगाराच्या कारभाराला  वैतागून बीड तालुक्यातील मेंगडेवाडी, धुमाळवाडी, काळेवाडी येथील  ४० विद्यार्थ्यांनी  एकत्रित येत तालुक्यातील जाधववाडी येथे शुक्रवारी सकाळी  बससमोरच ठिय्या आंदोलन करून संताप व्यक्त केला. शाळेच्या वेळेतच बस सोडली जावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली. 
   
तालुक्यातील चऱ्हाटा येथे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १२० आसपास आहे, परंतु या मार्गावर शाळेच्या वेळेनुसार बसच सोडली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शुक्रवारी सकाळी जाधववाडी येथे  विद्यार्थ्यांनी बस येताच बससमोर ठिय्या मांडला. चऱ्हाटा मध्यम स्वरुपाचे गाव असून या परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. सकाळच्या वेळी तर  विद्यार्थी व ग्रामस्थांची बसला मोठी गर्दी होते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांसह येथील शिक्षकांनी केली आहे. शिवाय विद्यार्थ्यांची संख्याही बसच्या क्षमतेएवढी असतानाही आगाराकडून दुर्लक्ष होत आहे. बसमध्ये जर जागा उपलब्ध नाही झाली तर विद्यार्थ्यांना  वेळप्रसंगी पायी  चालत जावे लागते. बीड-बेलखंडी-पाटोदा ही बस सकाळी ९ व दुपारी ३ या शाळेच्या वेळेत सोडण्याची मागणी या वेळी विद्यार्थ्यांनी केली आहे. याबाबत बीड येथील आगारप्रमुखांनाही लेखी निवेदन देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...