आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी बाजार समितीवर वरपुडकर, खासदार जाधवांचे वर्चस्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने संचालकांच्या १८ पैकी १६ जागांवर घवघवीत यश संपादन करीत बाजार समितीवरील वर्चस्व अबाधित केले. प्रतिस्पर्धी पॅनलच्या प्रत्येकच मतदारसंघात मोठ्या फरकाने पराभव झाला. केवळ माजी सभापती विजय जामकर हे एकमेव निवडून आले, तर एका मतदारसंघात अपक्षाने यश संपादन केले.

मागील दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी (दि.११) ९६ टक्के मतदान झाले. सोमवारी (दि. १२) सकाळी आठ वाजेपासून कल्याण मंडपम येथे मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात झाली. साधारणत: दुपारी बाराच्या सुमारास संपूर्ण निकाल हाती आले. सुरुवातीपासूनच जय नृसिंह शेतकरी विकास पॅनलने प्रत्येकच मतदारसंघात आघाडी घेण्यास सुरुवात केली. ही आघाडी अखेरपर्यंत कायमच राहिली. वरपुडकर, खासदार जाधव पॅनलच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख यांनी ‘नवे पर्व..गरीब सर्व’ या घोषवाक्याने निवडणूक रिंगणात दाखल केलेल्या परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचा तर दारुण पराभव झाला. काही मतदारसंघांत तीन अंकही या उमेदवारांना गाठता आले नाहीत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी माजी सभापती विजय जामकर, माजी सभापती स्वराजसिंह परिहार, भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, शिवसेनेचे कल्याणराव रेंगे यांनी गठित केलेल्या शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी अखेरपर्यंत प्रयत्न करूनही मोठ्या फरकाने त्यांना पराभवास तोंड द्यावे लागले. केवळ विजय जामकर हे एकमेव विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी बी. डी. दुधाटे यांनी सर्व निकाल जाहीर केले. सहकारी संस्था मतदारसंघात समशेर सुरेशराव वरपुडकर यांनी सर्वाधिक मते मिळवत विजयश्री संपादन केली. त्यांच्यापाठोपाठ याच पॅनलचे सोपानराव अवचार, गणेश रामभाऊ घाटगे, चंद्रकांत पांगरकर, तानाजी भोसले, बालासाहेब रसाळ तसेच प्रतिस्पर्धी पॅनलचे विजय जामकर यांनी विजय मिळवला. महिला राखीवमध्ये लताबाई शामराव इंगळे व काशीबाई रुस्तुमराव रेंगे विजयी झाल्या.
बातम्या आणखी आहेत...