आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MP Sunil Gaikwad Paid Farmer Electricity Bill In Latur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूशी झुंजणार्‍या शेतकर्‍याचे बिल खासदारांनी भरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - गेल्या आठवड्यात खासगी कर्जाच्या तगाद्यामुळे विष प्राशन केलेल्या शेतकर्‍याची मृत्यूशी झुंज संपल्यानंतर त्यांच्या मुलांना बिल भरण्याची कसरत करावी लागत होती. याबाबतचे वृत्त "दिव्य मराठी'ने मंगळवारच्या (आठ सप्टेंबर) अंकात प्रसिद्ध केल्यानंतर खासदार सुनील गायकवाड यांनी बुधवारी दुपारी स्वत: रुग्णालयात जाऊन एक लाख दहा हजारांचे बिल अदा केले. रुग्णालयाने त्यातील चाळीस हजार रुपये शेतकर्‍याला देणार असल्याचे घोषित केले. पैशांचा तिढा सुटल्यामुळे शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांनी खासदार सुनील गायकवाड आणि त्याला गती दिल्याबद्दल "दिव्य मराठी'चे आभार व्यक्त केले.

लातूर शेजारच्या कोळपा तांडा येथील राम चव्हाण या शेतकर्‍याने खासगी सावकारीला कंटाळून दहा दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ लातूरच्या लोकमान्य अतिदक्षता रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांची ससेहोलपट होत होती. त्याची माहिती कळताच लातूर शिवसेनेने ११ हजार, जनता विकास परिषदेचे अध्यक्ष शिवाजी नरहरे यांनी १० हजारांची मदत केली. "माझं लातूर' या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातूनही शेतकर्‍याला पैसे दिले गेले. मात्र, खर्च मोठा आणि मदत तोकडी अशी स्थिती झाली होती. याचे वृत्त कळताच लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर खासदार सुनील गायकवाड यांनीही रुग्णालयाला भेट देऊन शेतकर्‍याच्या कुटुंबीयांना धीर देत सर्व वैद्यकीय खर्च उचलणार असल्याचे जाहीर केले होते. मधल्या काळात शेतकर्‍याची मृत्यूशी झुंज संपली आणि ते धोक्याच्या बाहेर आले. मात्र, बिलाचे १ लाख १० हजार आणि लॅब, एक्स-रे, बाहेरील डॉक्टरांची कन्सल्टिंग फीस असे इतर १५ हजार भरण्याची सूचना रुग्णालयाने शेतकर्‍याचा मुलगा चंदू चव्हाण याला केली.

त्यासाठी आमदार-खासदारांना जाऊन भेटण्यासही सांगितले. चंदूने याबाबत दोघांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. त्यामुळे एकीकडे आश्वासने आणि दुसरीकडे रुग्णालयाचा लकडा यामुळे चव्हाण कुटुंबीय कोंडीत सापडले होते. याबाबत "दिव्य मराठी'ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले. ते सोशल मीडियातून व्हायरल झाले. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा लातूरला आलेल्या खासदार सुनील गायकवाड यांनी बुधवारी दुपारी रुग्णालयात जाऊन १ लाख १० हजारांचे बिल सुपूर्द केले. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. हंसराज बाहेती यांनी त्यातील ४० हजारांची रक्कम कमी करून ती शेतकर्‍याला देणार असल्याचे घोषित केले. खासदारांनी शब्दाला जागून मदत केल्याबद्दल आणि "दिव्य मराठी'ने त्याला गती दिल्याबद्दल चव्हाण कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहेत. आश्वासन दिल्याप्रमाणे पैसे देणारच होतो. अचानक मुख्यमंत्र्यांसोबत गुलबर्ग्याला जावे लागले. तेथून एका बैठकीसाठी नांदेडला जावे लागले. परिणामी लातूरला येता आले नाही. त्यामुळे बिल अदा करण्यास उशीर झाला, असे खासदारांच्या वतीने सांगण्यात आले.