आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mseb Cut 65 Thousand Farmers Electricity Supply In Usmanabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

65 हजार शेतकर्‍यांना महावितरणचा जबर शॉक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - जिल्ह्यातील कृषिपंपधारकांकडील चालू थकीत वीज बिलासाठी त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश स्थानिक अधिकार्‍यांना देण्यात आला आहे. एक हजारपेक्षा जास्त रुपयांची थकबाकी असणार्‍या जिल्ह्यातील 65 हजार 634 कृषिपंपधारकांचा वीजपुरवठा 31 ऑगस्टपर्यंत खंडित करण्याचे आदेश अभियंत्यांना देण्यात आले आहेत. अशा कृषिपंपधारकांकडे 70 कोटी रुपयांची थकबाकी असून अगोदरच दुष्काळाने होरपळलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना महावितरणच्या या फतव्याचा मोठा फटका बसणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात 11 व 33 केव्हीची एकूण 85 वीज उपकेंद्रे आहेत. ही उपकेंद्रे, दोन विभाग व दहा उपविभागांतर्गत कार्यरत आहेत. या अंतर्गत लाखो कृषिपंपधारकांना वीजपुरवठा केला जातो. या कृषिपंपधारकांकडे एकूण 460 कोटी 96 लाख रुपयांची रक्कम वीज बिलापोटी थकीत आहे. यामध्ये एप्रिल 2012 ते मार्च 2013 या चालू बिलापोटी एक लाख 20 हजार 603 कृषिपंपधारकांकडे 70 कोटी रुपयांची रक्कम येणे बाकी आहे. महावितरणने या चालू बाकीच्या वसुलीसाठी नुकतीच अधिकार्‍यांची बैठक घेऊन वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सर्वाधिक 11 हजार कृषिपंपधारक कळंब उपविभागांतर्गत आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाने दिलेल्या ओढीमुळे दुष्काळी परिस्थिती होती. चालू वर्षी थोड्याफार प्रमाणात पावसाने हजेरी लावली असली तरी परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. सध्या शेतात दिसत असलेल्या पिकाच्या बळावर मागील दोन वर्षांचा दुष्काळ झटकण्यासाठी शेतकरी स्वप्न रंगवत असताना महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देऊन त्यांना जबर शॉक दिला.

तोडणीसाठी प्रतिदिन उद्दिष्ट : प्रत्येक दिवशी किती कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करायचा, याचीही संख्या बैठकीत देण्यात आली आहे. यामध्ये उस्मानाबाद ग्रामीणने दररोज 261, तेरने 348, कळंबने 478, वाशी 217, उमरगा 261 असे वीजपुरवठा खंडित करण्याचे उद्दिष्ट प्रत्येक दिवसासाठी देण्यात आले आहे.

निष्काळजी करणार्‍या कर्मचार्‍याचे निलंबन
महावितरणची कृषिपंपधारकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी डीपी बंद करण्याची कारवाई करावी लागली. एप्रिल 2012 ते मार्च 13 पर्यंतच्या वीज बिलाचा भरणा करणार्‍या कृषिपंपधारकांचा वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. थकबाकीमुळे कर्मचार्‍यांचे पगार बंद करण्यात आले असून निष्काळजी करणार्‍या कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात येईल.’’ अनिल नेरलकर, सहायक अभियंता