आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसगाड्या खिळखिळ्या, अन् काळ्या धुरांच्या रेषा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - येथील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत ध्वनीसह हवा प्रदूषण व सुरक्षेचे कारण देत वेरूळ लेणीतील वाहनतळ एमटीडीसीच्या वेरूळ पर्यटन केंद्रात जानेवारी महिन्यात हलवण्यात आले. लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेसाठी महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली. प्रारंभी नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी बनवण्यात आलेल्या बीएस-४ या प्रदूषणमुक्त बसेस येथे सुरू करण्यात आल्या. परंतु या बसेस काही दिवस येथे चालवून नंतर येथे महामंडळाच्या जुन्या गाड्या सुरू करण्यात आल्याने गाड्यातून मोठ्या प्रमाणावर काळा धूर येत असल्याने प्रदूषणाला हरताळ फासला जात आहे, तर सीट व खिडक्याही अनेक ठिकाणी तुटल्याने आरामदायी गाड्या देश-विदेशातील पर्यटकांसाठी आता डोकेदुखी बनली आहे. अनेक देश-विदेशातील पर्यटक फक्त पायी पाहता येणाऱ्या लेणी क्र. १ ते १६ पाहून परत फिरत असून पर्यटक बसची दुरवस्था पाहता लेणी क्र. १७ ते ३४ या लेणी पाहण्यास टाळाटाळ करतात.

अशी आहे सध्याची बससेवा
या ठिकाणी सध्या पाच बसेस देण्यात आल्या असून वेरूळ पर्यटक केंद्र ते लेणी तिकीट घर दोन बसेस व तिकीट घर ते चौतीस क्रमांक लेणीपर्यंत तीन बसेस चालतात, तर याकरिता पाच चालक तीन वाहक कार्यरत आहे. या पूर्ण प्रवासाकरिता पाच वर्षापुढील सर्वाना २१ रुपये दर प्रत्येकी आकारण्यात येत आहे.

पर्यटकांची तपासणी झाली कडक
पुरातत्त्व विभागाने पर्यटन केंद्र ते तिकीट घर व तिकीट घर ते लेणी अंतर्गत अशी बस व्यवस्था करत आतील व बाहेरील बसच्या सुरक्षेच्या कारणास्तव संपर्क तोडत प्रत्येक पर्यटकाची रांगेतून तपासणी करूनच पुढे सोडण्यात येत आहे. यामुळे बसमधून धोकादायक वस्तू आत जाणे अशक्य झाले आहे.

सुट्या पैशांचे होते वांधे
वेरूळ लेणीमध्ये एका पर्यटकास बसने जाण्याकरिता २० रुपये दर आकारण्यात येत होते. हे दर अंतराच्या तुलनेत पर्यटकांना जास्त वाटत होते त्यातच परिवहन मंत्र्यांनी प्रत्येक बसच्या तिकिटावर इन्शुरन्स म्हणून एक रुपयांची वाढ केल्याने आता लेणीतील बसचे तिकीट २१ रुपये झाले आहे. परंतु या एक रुपया सुट्याकरिता नेहमी वाहक व पर्यटक यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
अनेक गाड्या खिळखिळ्या
वेरूळ लेणीत चालू असलेल्या सर्वच गाड्या जुन्या असल्याने काही गाड्यांचे सीट व त्यांचे हँडल तुटलेल्या, काचा निसटलेल्या असल्याने पर्यटक नाराज होताना दिसत आहे, तर पर्यटकांची सुरक्षाही धोक्यात आहे.

बसगाड्या बदलण्याची गरज
येथे दरडोई हजारो देशी विदेशी पर्यटक भेटी देत असतात. या वेळी हे पर्यटक बसमधून प्रवास केल्यावर नाराज होतात यामुळे या
बसेस बदलून चांगल्या बसेस या ठिकाणी देणे गरजेचे आहे. - हेमंत हुकरे, संवर्धन सहायक वेरूळ लेणी

हॉर्नपेक्षा बसचा आवाज जास्त
येथे चालू असलेल्या बसेस या एवढ्या जुन्या आहेत की आत बसल्यानंतर हॉर्नपेक्षाही बसचाच आवाज जास्त येतो. यामुळे देशी विदेशी पर्यटक नाराज होतात तर वाढीव एक रुपया हे २० रुपयात जमा करावा सुट्या पैशाचाही त्रास पर्यटकांना होतो. तर अंतराच्या व सेवेच्या मानाने २० रुपयेही पर्यटकांकडून जास्त दर आकारला जात आहे. -आमोद बसवले, पर्यटक मार्गदर्शक
बातम्या आणखी आहेत...