आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डांबलेल्या मुकादमाची पोलिसांनी केली सुटका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर - तालुक्यातील हास्तूर तांडा येथील ऊसतोड मुकादम एकनाथ आढे यांना सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा साखर कारखान्याच्या मजूर गुत्तेदाराने डांबून ठेवले होते. परतूर न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी त्यांची सोडवणूक केली.
हास्तूर तांडा येथील ऊसतोड मुकादम एकनाथ आडे हे म्हाडा साखर कारखान्याला ऊसतोड मजुरांची टोळी पुरविण्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून करतात. कारखान्याचे मजूर गुत्तेदार यशवंत शंकरराव खोटे (रा. अंजनगाव उमाटे, ता. म्हाडा) यांना यावर्षी आढे यांनी मौजे रंगोपंत टाकळी येथून ऊसतोड करण्यासाठी 8 जोड्या ठरवून खोटे यांच्याकडून या जोड्यांना देण्यासाठी 8 लाखांची उचल केली. त्यापैकी 3 लाख रुपये मजुरांना दिले, परंतु या जोड्या कारखान्याकडे कामावर गेल्याच नाहीत. त्यामुळे आढे यांनी उचल केलेली रक्कम परत केली. दीड महिना उलटल्यानंतर यशवंत खोटे हे आढे यांच्याकडे जीपमध्ये चार माणसे घेऊन आले व दुसरे मजूर पाहण्याच्या बहाण्याने 10 जानेवारी 2012 रोजी अंजनगाव येथे घेऊन गेले. आणि त्यांच्या घरी डांबून ठेवले. आठ दिवस झाले तरी वडील घरी न परतल्याने चौकशी करीत मुलगा ज्ञानेश्वर याने सरळ अंजनगाव गाठले. त्या ठिकाणी यशवंत खोटे याने वडिलांना सोडविण्यासाठी 3 लाखांची मागणी केली. ही माहिती ज्ञानेश्वरने परतूर पोलिसांना दिली. परंतु पोलिसांनी दखल न घेतल्याने त्याने अँड. ए. जे. देशमुख यांच्यामार्फत 17 जानेवारी रोजी न्यायालयात अर्ज दाखल केला असता न्यायाधीश राजेंद्र तांबे यांनी सर्च वॉरंट काढून पोलिसांना शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने अंजनगाव येथे जाऊन एकनाथ आढे यांची सुटका करून आणली. या पथकात आर. टी. वेलदोडे, सुरेश राठोड, निवृत्ती शेळके आदींचा समावेश होता.