आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukund Kulkarni\'s Analysis Attack On Dhananjay Munde

आमदार धनंजय मुंडे यांच्यावर दगडफेक प्रकरण, बाजी मारण्याचा प्रयत्न जनतेने हाणून पाडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- वंजाराबहुल भाविकांनी व्यापलेल्या भगवानगडावर पोहोचून अस्तित्व सिद्ध करण्याच्या आणि सरकारमधील मंत्र्यांहून अगोदर बाजी मारण्याच्या प्रयत्नात पाच जानेवारीला गडावर गेलेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांना दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनीच चपराक दिली आणि बाजी मारण्याचा प्रयत्नही हाणून पाडला.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी पंगा घेऊन शरद पवार, अजित पवार यांच्या गळ्यातील ताईत बनलेले आमदार धनंजय मुंडे यांना विधानसभा निवडणुकीत चुलत बहीण आणि गोपीनाथ मुंडे यांची राजकीय वारसदार पंकजा यांच्याकडून हार पत्करावी लागली. राष्ट्रवादीनेही परळीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती; परंतु पंकजा मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडे यांना पराभूत व्हावे लागले. पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास, महिला बालकल्याण ही महत्त्वाची खाती आली. राज्यातील वंजारीबहुलच नव्हे, तर ओबीसी घटक गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून भाजपशी जोडला गेल्याचे समोर आले आणि राष्ट्रवादीने आणखी एक पत्ता टाकून पंकजा मुंडे यांच्या मार्गात जाळे टाकण्याचे काम केले. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आमदार धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आली. यातून पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री आणि बीड, लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्या तरी त्यांना स्वत:च्या परळीत आणि बीड जिल्ह्यात शह देण्याचा डाव रचला. या दोन्ही बहीण-भावांना लाल दिवा मिळाल्यामुळे परळीकरांनीच नव्हे, तर बीड जिल्ह्यातील जनतेने आनंद व्यक्त केला. परंतु दोघांमधील वैर अधिक गडद होऊ लागले. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांनी सर्वप्रथम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडावर भगवानबाबांच्या समाधिस्थळी माथा टेकवण्याचे ठरवले. परंतु तत्पूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अर्धे मंत्रिमंडळ सहा जानेवारीला भगवानगडावर येणार असल्याचे स्पष्ट झाले. भगवानगडावर यापूर्वी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याच उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते येऊन गेलेले आहेत; परंतु अर्धे मंत्रिमंडळ येणार असूनही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना गडावरील निमंत्रण मिळाले नाही. निमंत्रण नसले तरी मंत्रिमंडळ येण्यापूर्वीच भगवानगडावर जाऊन नतमस्तक होण्याचे धनंजय मुंडे यांनी ठरवले आणि पाच जानेवारीला पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथगडावरून धनंजय मुंडे थेट भगवानगडावर दाखल झाले. परंतु तेथे पोहोचताच 'गोपीनाथ'भक्तांनी धनंजय मुंडेंना स्वीकारले नाही.

'त्यांना' यापूर्वीचा अनुभव आहे
भगवानगडावर यापूर्वी राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज येऊन गेलेले आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराचा, मुंडेंवर प्रेम करणारा गडाचा भाविक असला; तरी गेल्या तीन वर्षांत आमदार धनंजय मुंडे गडावर किती वेळा गेले ? त्यांना यापूर्वी जिल्ह्यात अनुभव आलेला आहेच. -पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री.