आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईतील तीन गिरण्या विदर्भात, एक बार्शीला - फडणवीस सरकारचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - निझामाच्या काळापासून शहरातील हजारो कुटुंबांचा चरितार्थ चालवणारी एनटीसी मिल (पूर्वाश्रमीची उस्मानशाही मिल) सुरू करण्याचे आश्वासन २०११ मध्ये एनटीसीचे उपमहाप्रबंधक आर.के. शर्मा यांनी पत्राद्वारे दिले. त्यानंतर चार वर्षांचा कालावधी लोटूनही मिल सुरू झाली नाही. फडणवीस सरकारने मुंबईतील चार आजारी गिरण्यांपैकी तीन गिरण्या विदर्भात नांदगाव पेठ एक गिरणी बार्शी येथे सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने गिरणी कामगार वर्गात तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
निझामाने सुरू केलेल्या उस्मानशाही मिलने एकेकाळी १० हजार लोकांना रोजगार दिला. त्या वेळी शहराची लोकसंख्या केवळ ६० हजार होती. शिवाय या गिरणीच्या भरवशावर इतरही उद्योग, व्यवसाय भरभराटीला आले. १९७४ मध्ये मिलचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर तिचे नाव एनटीसी मिल असे करण्यात आले. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या चुकीच्या धोरणाने, मिलचे आधुनिकीकरण करता कामगारांवरील कामाचा बोजा वाढवून व्यवस्थापनाने या मिलमधील कामगारांची संख्या कमी करत नेली. २००८ मध्ये ही मिल पूर्णत: बंद करण्यात आली.
मिलसुरू करण्याचे आश्वासन

विकास समितीचे सचिव एम. ए. हाफिज यांनी ही मिल सुरू करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. पंतप्रधान मनमोहनसिंग (११ ऑगस्ट २००८), वस्त्रोद्योगमंत्री शंकरसिंग वाघेला (२५, २६, २७ फेब्रुवारी २००८), राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (१३ ऑक्टोबर २०१०) यांच्यासह अनेक नेत्यांना पत्र पाठवून ही मिल पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. राष्ट्रपतींना पत्र दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०११ रोजी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे उपमहाप्रबंधक आर. के. शर्मा यांनी पत्र पाठवून ही मिल आधुनिकीकरणासह सुरू करीत असल्याचे कळवले, परंतु अद्याप हालचाल झाली नाही. एनटीसीकडे कोणीच लक्ष देत नाही हे मराठवाड्याचे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया औद्योगिक विकास समितीचे सचिव एम. ए. हाफिज यांनी दिली.
कारखाने विदर्भात

एनटीसी मिल सुरू करण्याची मागणी सातत्याने होत असताना २००८ च्या सुमाराला फिनलेची कापड गिरणी अमरावतीला गेली. आता देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईतील चार आजारी गिरण्यांपैकी तीन गिरण्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ, एक गिरणी बार्शीला हलवण्याचा निर्णय घेतला. नांदेडची एनटीसी मिल सुरू करण्याबाबत मात्र कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने मुख्यमंत्र्यांकडे सोमवारी निवेदन पाठवून त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

सर्व सुविधायुक्त मिल

एनटीसी मिल देशातील सर्वात मोठी गिरणी आहे. तिच्याकडे स्वत:ची ३०० एकर जमीन आहे. टेक्स्टाइल पार्क येथे आरामात सुरू होऊ शकताे. मिलमध्ये सर्व यंत्रसामग्री तयार आहे. इमारत, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आदी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. केवळ अत्याधुनिक मशिनरी आणल्यास ही गिरणी पुन्हा सुरू होऊ शकते. आजही १० हजार कुटुंबांना रोजगार देण्याची क्षमता या मिलमध्ये आहे.