Home »Maharashtra »Marathwada »Other Marathwada» Drama Festival In Usmanabad Inaugration Speech By Jayant Sawarkar

आश्वासने खूप मिळाली, अाता सरकारने कृती करावी, संमेलनाध्यक्ष सावरकर यांचे मनोगत

जयश्री बोकील, सुलभा देशपांडे नाट्यनग� | Apr 22, 2017, 06:35 AM IST

  • उस्मानाबादमध्ये मराठी नाट्य संमेलनाचे उद‌्घाटन झाले. या वेळी संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांचा सत्कार करताना मावळते नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर.
उस्मानाबाद- ‘कलावंतांना किमान जगण्याइतपत पेन्शन मिळावे, इतकी साधी अपेक्षा ज्येष्ठ कलावंतांची आहे. आजवर कित्येक वर्षे रंगकर्मींना निव्वळ आश्वासने खूप मिळाली, नव्या सरकारकडून आता कृतीची अपेक्षा आहे’, अशी अपेक्षा नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी शुक्रवारी संमेलनाच्या उद‌्घाटन कार्यक्रमात व्यक्त केली. सुमारे दहा हजार रसिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी उस्मानाबादमध्ये ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे शानदार उद‌्घाटन झाले.

राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर उद‌्घाटन हाेते. स्वागताध्यक्ष सुजितसिंह ठाकूर, मावळते नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, माजी संमेलनाध्यक्ष राम जाधव तसेच आनंद रायते, पंकज देशमुख, ज्ञानेश्वर चौगुले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी व्ही. शांताराम स्मृती पुरस्कारप्राप्त अभिनेते अरुण नलावडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच उस्मानाबादमधील अनेक ज्येष्ठ रंगकर्मींचा सन्मानही करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतात जयंत सावरकर यांनी नाट्यव्यवसायाची सद्य:स्थिती, नाटकांचे शहरी भागांत झालेले केंद्रीकरण, नाट्यगृहांची दुरवस्था, बंद झालेली ठेकेदारी पद्धत.. अशा अनेक मुद्यांचा उल्लेख केला. ‘ज्येष्ठ रंगकर्मींना दिवसाला मिळणाऱ्या ७० रुपयांच्या पेन्शनमध्ये त्यांनी नेमके काय करायचे?’, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. त्यातील उपरोध जाणून मंत्री महादेव जानकर यांनी त्वरित मुख्यमंत्र्यांसह बैठक घडवून आणण्याचे आश्वासनही दिले. नाट्यगृह हे प्राधान्यक्रमाने नाटकासाठीच असावे, असेही सावरकर म्हणाले. रसिक म्हणवून घेणाऱ्या प्रेक्षकांना मात्र रंगभूमी, कलाकार, नाट्यसंस्था, निर्माते, कलावंत, त्यांच्या अडचणी, समस्या, पडद्यामागील कलाकारांकडे होणारे दुर्लक्ष यांच्याविषयी आस्था नसते, सोयरसुतक नसते, असे बोलही सावरकरांनी ऐकवले.
निधीत भरीव वाढ करू: जानकर
जानकर म्हणाले,‘नाट्यसंमेलनासाठी सरकारी निधीत भरीव वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यास प्राधान्य देईन. उस्मानाबाद ही संतांची भूमी आहे. एरवी शहरी भागांत केंद्रित झालेली संमेलने उस्मानाबादसारख्या दुष्काळी भागात घेण्याची मानसिकता नाट्य परिषदेने दाखवली. नट, दिग्दर्शक, कलावंतांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी यानिमित्ताने येथील रसिकांना मिळाल्याचे ते म्हणाले.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी संमेलनासाठीचा निधी वाढवून मिळावा, पडद्यामागील कलावंतांच्या घरांसाठी योजना असावी, गावोगावी प्रयोगांच्या सुविधा मिळाव्यात, अशा मागण्या नोंदवल्या. दीपक करंजीकर यांनीही नाट्य परिषदेने संरचना, संघटन, समन्वय अशा त्रिविध आघाड्यांवर केलेल्या लक्षणीय कामांचा आढावा घेतला.
स्वागताध्यक्ष सुजितसिंह ठाकूर म्हणाले,‘उस्मानाबादमधील संमेलन म्हणजे रसिकांसाठी पर्वणी आहे. यानिमित्ताने दिग्गज कलावंतांचा अभिनय पाहण्याची संधी मिळणार आहे. स्थानिक नाट्य चळवळीला त्यातून ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. पायाभूत सुविधांची कमतरता असूनही कार्यकर्त्यांचा, रसिकांचा उत्साह प्रचंड असल्याने हे संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेतला.’

कलाकारांवर प्रेम करणारी भूमी: गवाणकर
गंगाराम गवाणकर म्हणाले,‘दुष्काळी भागात संमेलन आयोजित करण्याविषयी सुरुवातीला नकारात्मक सूर होता. पण आज येथील हजारो रसिकांचा उत्साही सहभाग पाहून एखादा राज्याभिषेक सोहळा असावा असे वाटते आहे. ही भूमी कलाकारांवर प्रेम करणारी आहे, हे रसिकांनी उपस्थितीने सिद्ध केले. संमेलनाच्या अध्यक्षाला अधिकार नाहीत, पण हा मान आहे. मला १४ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला, त्यात ठिकठिकाणी मला जे मानधन मिळाले त्यात स्वत:ची भर घालून मी नाट्यकलाकार संघाला एक लाख रुपयाची देणगी देऊ शकलो. पडद्यामागील कलाकारांच्या कामांसाठी शासनाची बैठक घेतली. बालरंगभूमीसाठी लघुनाट्यगृहाचे भाडे कमी करून घेण्यात यशस्वी झालो, असे ते म्हणाले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, नाट्यदिंडीत दिग्गज कलावंतांनी धरला ठेका!...

Next Article

Recommended