आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबड- स्वच्छतागृहांचे अनुदान लाटले; 800 जणांना फौजदारी नोटिसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड - अंबड नगर परिषद मार्च २०१६ पर्यंत शहर पाणंदमुक्त करण्याचा संकल्प घेऊन कामाला लागली आहे. याअंतर्गत नगर परिषदेकडे तीन हजार नागरिकांनी स्वच्छतागृहासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. यापैकी दोन हजार ठिकाणचा सर्व्हे पूर्ण केल्यानंतर नगर परिषदेने एक हजार १९४ जणांच्या खात्यावर योजनेतील पहिल्या टप्प्याचे सहा हजार रुपयांचे अनुदान वितरित केले. मात्र, हे अनुदान देऊन महिना उलटला तरीही स्वच्छतागृहाचे काम सुरू न केलेल्या ८०० नागरिकांना नगर परिषदेने फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

अंबड नगर परिषदेने महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियानाअंतर्गत दोन हजार वैयक्तिक स्वच्छतागृहे देण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने आवाहन केल्यानंतर तीन हजार नागरिकांनी स्वच्छतागृह मिळावे, यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले. या अर्जांची छाननी करून नगर परिषद कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सर्व्हे केला. या सर्व्हेदरम्यान अनेक नागरिकांकडे वैयक्तिक स्वच्छतागृह असतानाही त्यांनी अर्ज केल्याचे तसेच अनेकांनी पती व पत्नीच्या नावे वेगवेगळे अर्ज दाखल केल्याचे आढळले. अशा अर्जांना वगळण्यात आले. तसेच सर्व्हे पार पडल्यानंतर डिसेंबर महिन्यात १ हजार १९४ लाभार्थींना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी सहा हजार रुपये म्हणजेच एकूण ७१ लाख ६४ हजारांचे अनुदान वितरित केले. २१० नागरिकांच्या खाते क्रमांकाची अडचण झाल्याने रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकली नाही. दरम्यान, अनुदानाचा लाभ घेऊन महिना उलटला तरीही आतापर्यंत स्वच्छतागृहाचे काम सुरू न केलेल्या ८०० नागरिकांना पालिकेने बुधवारपासून नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसीमध्ये तीन दिवसांत काम सुरू करावे, अन्यथा आपणावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही संबंधित लाभार्थींना देण्यात आला आहे.

अनुदान न देताही नोटिसा : अंबड नगर परिषदेने स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू न करणाऱ्यांना कारवाईची नोटीस दिली आहे. मात्र, २०० नागरिकांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम जमा झालेली नसताना त्यांनाही गुन्हा दाखल करण्याची नोटीस बजावली आहे.
सर्वेक्षणाला कर्मचारी वैतागले
स्वच्छतागृहासाठी अर्ज केलेल्या अनेक नागरिकांकडे पूर्वीचेच स्वच्छतागृह उपलब्ध आहे. काही जणांनी एकाच घरात पती व पत्नीच्या नावावर दोन अर्ज सादर केले आहेत. असे अनेक प्रकार असल्याने अर्जदारांचे सर्वेक्षण करताना नगर परिषद कर्मचाऱ्यांही अक्षरश: वैतागले आहेत.
कारवाई करणार
^अनुदान घेऊनही स्वच्छतागृहाचे काम सुरू न केलेल्या ८०० नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. संबंधितांनी येत्या तीन दिवसांत काम सुरु केले नाही तर तत्काळ त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व लाभार्थींनी तातडीने स्वच्छतागृहाचे काम सुरू करून शहर पाणंदमुक्तीसाठी मदत करावी.
नंदकिशोर भोंबे, मुख्याधिकारी, अंबड.
अनुदानात वाढ
स्वच्छतागृह उभारण्यासाठी नगर परिषद १२ हजार रुपये अनुदान प्रत्येक लाभार्थीला देणार होती. मात्र, आता नगर परिषद यात तीन हजार रुपये टाकणार असल्यामुळे आता लाभार्थींना १५ हजार रुपये अनुदान मिळेल. या अनुदानाचा वापर केवळ स्वच्छतागृहासाठीच अनिवार्य आहे. प्रत्येकाने स्वच्छतागृह बांधून त्याचा वापर करावा व शहर स्वच्छ व सुंदर ठेवावे.
मंगल कटारे, नगराध्यक्षा, अंबड.