आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणुकीच्या तोंडावर लातूरला चार दिवसांआड पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - जिल्हा परिषदेत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसजनांचे डोळे उघडताना दिसत असून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आठ दिवसांऐवजी आता चार दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  
 
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात यंदा मुबलक पाणीसाठा आहे. त्यापूर्वी मागच्या चार-पाच वर्षांत पाऊसच पडला नव्हता. त्यामुळे धरणाने तळ गाठला होता. त्या काळात आठ दिवसांला एकदा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. गतवर्षी तर धरणच कोरडे पडल्यामुळे नळाचे पाणी फेब्रुवारी महिन्यापासून बंद करण्यात आले होते.
 
जुलै महिन्यात पाऊस पडल्यानंतर धरण १०० टक्के भरले. त्यामुळे आता किमान एक-दोन दिवसांआड पाणी मिळेल असे नागरिकांना वाटले होते. मात्र बंद काळात धरणावरील उपसा पंप चोरीला गेल्याचे महापालिकेचे म्हणणे होते. तसेच तेथील वीजपुरवठाही बंद होता. तो आता सुरळीत करण्यात आला आहे. 
 
मात्र शहरातील वितरण व्यवस्था योग्यस्थितीत नसल्यामुळे पाण्याचा उपसा दुप्पट आणि पुरवठा निम्माच अशी स्थिती होती. तरीही दोन महिन्यांपूर्वी नळाला आठ दिवसांला एकदा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. परंतु त्याची अंमलबजावणी करता आली नव्हती. चार दिवसांपूर्वी २५ वर्षे सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाला सपाटून मार खावा लागला. त्याचे पडसाद महिनाभरावर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या निवडणुकीवर पडू शकतात याची जाणीव सत्ताधारी काँग्रेसजनांना झाली असावी. त्यामुळेच पुन्हा एकदा हालचाली होऊन काहीही करा पण चार दिवसांआड पाणीपुरवठा करा असे सांगण्यात आले.
 
त्यानुसार महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाने येत्या दोन दिवसांमध्ये चार दिवसांआड पाणीपुरवठा करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच अंतर्गत दुरुस्तीमुळे काही भागांत पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, अशी पळवाटही शोधून ठेवली आहे.  
 
आचारसंहिता लागू होण्याअगोदर घाई  
लातूर शहरात पाणीपुरवठ्याबाबतीत नियोजन नसल्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी भीषण पाणीटंचाईतही सत्ताधारी काँग्रेसला परिस्थिती नीटपणे हाताळता आली नव्हती. दुसरीकडे राज्य शासनाच्या आवाहनानुसार केंद्राने लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा केला. त्याच्या बदल्यात एक छदामही महापालिकेकडून घेतला नाही. त्याचा फायदा काँग्रेस विरोधकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस मंडळी चार दिवसांआड पाणी सोडण्याची घाई करीत आहेत. आचारसंहिता लागू होण्याअगोदरच हा निर्णय व्हावा यासाठी पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...