आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरच्या लोकांकडून कुऱ्हाड-काठीने हल्ला; आईचा मृत्यू, लेक जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - १२ डिसेंबर २०१४ रोजी माझं लग्न झालं. अवघ्या ६-७ महिन्यांतच सासरकडून जाच होऊ लागला. दिवाळीला मला माहेरी काढून दिले. मी वारंवार फोन केल्यावर गेल्या ८ दिवसांपूर्वी नवरा घेऊन गेला, पण सासरच्या लोकांनी पुन्हा जाच केला. मी माहेरी आले. आईने समजूत काढून मंगळवारी पुन्हा सासरी नेले. अन् अवघ्या अर्ध्या घंट्यात सासरच्या लोकांनी आम्हाला बेदम मारले. यात आईने जीव सोडला, कशी-बशी आईला घेऊन दवाखान्यात आले साहेब, असा टाहो फोडत जन्मदातीचा मृत्यू बघितलेली राधा सामान्य रुग्णालयात रडत होती. या वेळी अनेकांचे डोळे पाणावले.

अंबड तालुक्यातील कासारवाडी येथे मंगळवारी दुपारी १ वाजता ही हृदयद्रावक घटना घडली. यात शोभाबाई भगवान खडेकर (६०, गोलापांगरी, ता.जालना) यांचा मृत्यू झाला तर राधा सिद्धेजवाहर शिंगाडे (२२, कासारवाडी, ता.अंबड) या गंभीर जखमी झाल्या आहेत. राधा म्हणाल्या, नवरा-बायकोच्या किरकोळ बाचाबाचीमुळे मला सहा महिन्यांपूर्वीच माहेरी गोलापांगरीला पाठवून दिले होते. मात्र वडील नाही, भाऊ लहान, घरात आई, घरची परिस्थिती जेमतेमच. शिवाय, किती दिवस माहेरी राहायचे म्हणून नवरा सिद्धेजवाहर यांना सतत फोन केले. ८ दिवसांपूर्वीच नवरा मला सासरी कासारवाडीला घेऊन गेला. एक-दोन दिवस गेल्यावर पुन्हा नवरा, भाया, सासरा, सासू हे त्रास देऊ लागले, हुंड्याचे पैसे आण म्हणून मारहाण करू लागले. तसेच मारहाण करून मला माहेरी काढून दिले. आईने समजूत काढली व मंगळवारी सकाळी पुन्हा सासरी कासारवाडीला नेऊन सोडले. घरी पाणी पिऊन अंगणात बसले व सासरच्या लोकांची वाट बघू लागले. अर्ध्या तासांनी नवरा सिद्धेजवाहर (३०), भाया श्रावण (३५), सासरा बळीराम (५५), सासू सोमित्रा (५०) हे हातात कुऱ्हाड व दांडे घेऊन आले. सर्वप्रथम सासरा बळीराम याने मला मारहाण सुरू केली. डोक्यात लागल्यामुळे रक्तस्राव होऊ लागला व मला चक्कर आली. तेवढ्यात आई सोडवण्यास आली असता, तिलासुद्धा मारले. मारहाणीत रक्तबंबाळ झाल्यावर आई आणि मी दोघी आरडाओरड करू लागलो, मात्र मदतीला कुणीच धावले नाही. नवरा, भाया, सासरा, सासू या चौघांनी बेदम मारले. यात आई शोभा बेशुद्ध पडल्यावरसुद्धा मारहाण सुरूच होती. मी गावात आजूबाजूला सैरावैरा पळत सुटले व आईला दवाखान्यात घेऊन चला म्हणून विनवणी करू लागले. शेवटी एकजण आला व मला आणि आईला कारमध्ये टाकून अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणून टाकले. याठिकाणी डॉक्टरांनी तात्पुरती मलमपट्टी करून आम्हाला जालन्याला रेफर केले. येथे आल्यावर कळले की, आईने कधीचाच जगाचा निरोप घेतलाय. वडील १० वर्षांपूर्वीच मृत झालेले आहे, माझ्या लग्नासाठी आईने एक एकर शेत विकून हुंडा दिला होता. थाटात लग्न केले होते. माझ्या संसारासाठी सासरच्या लोकांना आईचा जीव घेतलाय, त्यांना सोडू नका अशी आपबीती सांगत राधा जिवाच्या अाकांताने हमसून-हमसून रडत होती. या वेळी उपस्थितांनी तिला शांत केले मात्र, सासरकडून झालेल्या मारहाणीच्या जखमा पाहत ती भीतीने थरथर कापत होती. डॉक्टरांनी तिच्यावर औषधोपचार केले.
लेकीचा मृत्यू, नात गंभीर
राधाचे मामा रंगनाथ गंगाधर कोरडे व आजी गयाबाई (आईची आई) हे चिकलठाणा येथून सामान्य रुग्णालयात आले. या वेळी लेक शाेभाबाईचा मृतदेह पाहून गयाबाई यांनी हंबरडा फोडला. माझी लेक गेली, जावई जाऊन १०-१२ वर्षे झाले होते. माझ्या लेकीने नात राधाचे लग्न करून वर्ष-दीड वर्ष झाले होते. एवढा काय गुन्हा केला होता, ज्यात माझ्या लेकीचा मृत्यू झाला, असा जाब विचारत गयाबाई रडत होत्या. तर भाची गंभीर जखमी असल्यामुळे मामा रंगनाथ हे तिच्यावर उपचारासाठी डॉक्टरांकडे विनवणी करत होते. तसेच नातेवाइकांना फोन करून घटनेचे क्रोर्य सांगत होते.
जालना येथे केले रेफर
अंबड येथील डॉ. अलिया खान यांनी प्रथमोपचार करून शाेभाबाई व राधा यांना १०८ अॅम्ब्युलन्सला बोलावून जालना येथील सामान्य रुग्णालयात रेफर केले. मात्र, शोभाबाईचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. जालना सामान्य रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
बातम्या आणखी आहेत...