आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोलीतील खून; एक जण ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या येथील बसस्थानकासमोर सोमवारी रात्री ३३ वर्षीय तरुणाच्या छातीत धारदार चाकू खुपसून खून करण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून व्यावसायिक कारणावरून हा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

बसस्थानकासमोर नवनाथ रसवंती आणि चहाचे हॉटेल चालवणारा राम मारोतराव चव्हाण (३७) आणि बसस्थानकातील कँटीन चालक गजलवार यांच्यात व्यावसायिक कारणावरून वाद झाला होता. सोमवारी रात्री साडेआठ वाजता सोनू विलास गजलवार, बाळू विलास गजलवार आणि विलास गजलवार यांनी राम चव्हाण याला जिवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर रात्री ९ च्या सुमारास गजलवार पिता-पुत्रांनी राम चव्हाणशी हुज्जत घालून सोबत आणलेला सुमारे दीड फूट लांबीचा चाकू थेट छातीत खुपसला. चाकू आरपार घुसल्याने राम चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळला. ऑटोचालक व इतरांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे अर्धा तास गंभीर जखमी चव्हाणला रुग्णालयात नेण्यात आले नाही. ज्या वेळी त्याला दहाच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्या वेळी त्याला मृत घोषित करण्यात आले.