आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या पतीचा खून, आरोपींना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड - विहामांडवा परिसरातील जायकवाडी कालव्याच्या पुलाखाली मृतावस्थेत आढळून आलेल्या अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा पोलिसांनी आठ दिवसांत छडा लावला आहे. अनैतिक संबंधांस अडसर ठरत असल्याने पत्नीच्या प्रियकराने हा खून केल्याचे उघडीस आले असून पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे.

सचिन बाबूराव पवार (३४, रा. ढाकलगाव, ता. अंबड, जि. जालना) अशी मृताची ओळख पटली असून मुख्य आरोपी नवनाथ विश्वनाथ आटोळे (३४, रा. ढाकलगाव, ता. अंबड, जि. जालना) व अन्य दोन जणांवर गुन्हे नोंद करून पाचोड पोलिसांनी नवनाथ अाटोळेला अटक केली. विहामांडवा परिसरातील डाव्या कालव्यालगतच्या पट्ट्याच्या पुलाखाली १७ जूनला ३४ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता हा मृतदेह अंबड तालुक्यातील ढाकलगाव येथील सचिन पवारचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मृताची ओळख पटताच पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी बच्चन सिंग, पोलिस निरीक्षक कांचनकुमार चाटे, पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग भारती यांनी तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान, नवनाथ विश्वनाथ आटोळे याने सचिन पवारचा खून केल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चाटे यांना मिळाली. या माहितीवरून नवनाथ आटोळेला अटक करून चौकशी केली असता सचिन पवारच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते व सचिन पवार अनैतिक संबंधांस अडसर ठरत असल्याने दोन साथीदारांच्या मदतीने सचिनचा गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपी आटोळेने दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी नवनाथ आटोळे व त्याच्या दोन साथीदारांना अटक करून पाचोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...