आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतीच्या वाटणीसाठी चुलता, चुलतीसह 5 जणांनी केला विष पाजून पुतणीचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून चुलत्याने पत्नी, सासरच्या लोकांच्या मदतीने  पुतणीचा विष पाजून खून केल्याची घटना परळी तालुक्यातील  अस्वलअंबा  येथे घडली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला.    

बबिता व्यंकटी भताने (१९) असे खून झालेल्या तरुणीचे  नाव आहे.   


याप्रकरणी तरुणीची आई ठकूबाई व्यंकटी भताने हिने  अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अस्वलअंबा येथील व्यंकटी हरिभाऊ भताने व त्याचा भाऊ विठ्ठल हरिभाऊ भताने  यांची शेजारी-शेजारी साडेआठ एकर  शेती आहे. २४ नोव्हेंबर २०१७  रोजी  सायंकाळी ७.३० वाजता विठ्ठल भताने यांनी जेसीबीने  बांध फोडून व्यंकटी यांच्या ताब्यातील जमिनीपैकी अर्धा एकरवर कब्जा करू लागला. यावरून दोघा भावात वाद झाला. विठ्ठलची पत्नी जयश्रीने दीर व्यंकटीच्या हाताला चावा घेतला. यानंतर भावकीतील लोकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. २५ नोव्हेंबरला विठ्ठलचे सासरे व मेहुणे अस्वलअंब्यात आल्याचे समजले तेव्हा कुटुंबातील सर्व जण वाद मिटवण्यासाठी आले असतील, असे समजून रात्री ११ वाजता व्यंकटी भताने हे  गावातील चार प्रतिष्ठित माणसांना बैठकीस बोलावण्यासाठी गेले. हे पाहून  विठ्ठलचा सासरा सोपान नागरगोजे, मेहुणे बालासाहेब  व गोविंद सोपान नागरगोजे (तिघेही रा. माळहिवरा), पत्नी जयश्री हे व्यंकटी भताने यांच्या घरात  घुसले. तेव्हा घरात फक्त व्यंकटी यांची पत्नी ठकूबाई ,मुलगी बबिता या दोघीच होत्या. तेव्हा पाच जणांनी व्यंकटी कुठे गेला आहे, अशी विचारणा करून  जिवे मारण्याची धमकी देत ठकूबाई यांना मारहाण  करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांची मुलगी बबिता ही तिच्या आईला वाचवण्यासाठी वादात पडली.  हे पाहून घरात घुसलेल्या पाच जणांनी बबिताला खाली पाडून  कीटकनाशक पाजले.  हे पाहून ठकूबाईंनी आरडाओरड  केली तेव्हा  शेजारचे काही लोक  त्या ठिकाणी आल्याने पाच जणांनी  पळ काढला. ठकूबाईंनी शेजारच्या लोकांच्या  मदतीने मुलगी बबिताला तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सोमवारी रात्री ११.४५  वाजता उपचारादरम्यान बबीताचा मृत्यू झाला.    
पाचही आरोपी फरार    
ठकूबाई भताने यांनी अंबाजोगाई ग्रामीण  पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सोपान गणपती नागरगोजे, बालासाहेब सोपान नागरगोजे, गोविंद सोपान नागरगोजे, विठ्ठल हरिभाऊ भताने, जयश्री विठ्ठल भताने यांच्यावर मंगळवारी दुपारी  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक श्रीकांत हरगबाळ हे तपास करत असून आरोपी फरार आहेत.   

बातम्या आणखी आहेत...