आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरारक घटना: पत्नी, मुलगा, भावाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - नायगाव तालुक्यातील अंतरगाव येथे शुक्रवारी रात्री २ ते ४ वाजेदरम्यान प्रल्हाद तोडे (४५) या व्यक्तीने पत्नी, मुलगा व भावाचा निर्घृण खून केला. खुनानंतर त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अत्यवस्थ अवस्थेत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कुंटूर पोलिस ठाण्यात खून व खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून प्रल्हादविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

अंतरगाव येथील प्रल्हाद तोडे याचा स्वभाव अत्यंत संशयी होता. त्याची पत्नी दुस-याशी बोलली तरी त्याला सहन होत नव्हते. संशयाचे पिशाच्च त्याच्या मानगुटीवर बसले होते. या संशयाच्या पिशाच्चानेच त्याला क्रूरकर्मा बनवले. पत्नी गऊबाई (४०) व मुलगा हणमंत प्रल्हाद तोडे (११) झोपेत असतानाच त्याने कुऱ्हाडीने दोघांच्याही गळ्यावर वार करून त्यांना जागीच ठार केले. त्यानंतर त्याने आपला मोर्चा शेताकडे वळवला. शेतातील आखाड्यावर भाऊ अशोक लक्ष्मण तोडे (५०) हा गाढ झोपेत होता. त्याच्याही गळ्यावर कुऱ्हाडीचे वार करून त्याने त्यालाही जागीच ठार केले. हा हल्ला करताना झालेल्या आवाजाने आखाड्यातील गच्चीवर झोपलेला प्रल्हादचा पुतण्या नारायण तोडेे जागा झाला. त्याने खाली येऊन त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने त्याच्यावरही हल्ला केला. त्यात तो किरकोळ जखमी अवस्थेत तेथून पळ काढला.
केवळ संशयी स्वभावाने त्याने खून केले. दुसरे कोणतेही कारण नाही, असे या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक योगेशकुमार, अपर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे, उपअधीक्षक मधुकर आवटे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. या घटनेने ग्रामस्थात संतापाची लाट उसळली असून गावात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

स्वत:ही विष घेतले
तीन जणांचे बळी घेतल्यानंतर प्रल्हादने स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतातील गडी व शेजा-यांनी त्याला तातडीने नायगावच्या रुग्णालयात आणले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. प्रल्हादची प्रकृती अजूनही चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे अधीक्षक डॉ. वाय.एच. चव्हाण यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...