आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळात प्रतिनिधित्व द्या, मुस्लिम समाजाचे साकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला विधिमंडळात प्रतिनिधित्व द्यावे यासाठी महापौर अब्दुल सत्तार यांच्यासह स्थानिक मुस्लिम नेत्यांनी अशोक चव्हाणांकडे जोरदार मागणी केली. राष्ट्रवादीकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांची विधान परिषदेवर नियुक्ती निश्चित झाल्याने राज्यपाल नियुक्त सदस्यात जिल्ह्यातून मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळेल का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाची 1 लाख 70 मते आहेत. संपूर्ण जिल्ह्यात मुस्लिम मतदारांची संख्या जवळपास 3 लाख आहे. मुस्लिम समाज आजपर्यंत एकमताने काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या पाठीशी शक्ती उभी केल्याने अशोक चव्हाणांना प्रतिकूल परिस्थितीतही विजय मिळवता आला. तथापि सय्यद फारुख पाशा (1962-67-72 काँग्रेस ) व प्रा. नुरुल्ला खान (1978 जनता पार्टी) या दोन जणांचा अपवाद वगळता नांदेड जिल्ह्यातून कोणीही मुस्लिम प्रतिनिधी विधिमंडळात किंवा संसदेत जाऊ शकला नाही.

पाच वर्षांपासून मागणी : 2008 मध्ये अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून मुस्लिम समाजाने विधिमंडळात प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी लावून धरली. पालकमंत्री डी.पी. सावंत व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनीही या मागणीला तत्त्वत: पाठिंबा दिला. परंतु त्या वेळी चव्हाणांचे जवळचे मित्र व कट्टर सर्मथक अमर राजूरकर यांना विधान परिषदेवर पाठविण्यात आले. मुस्लिम समाजाची नाराजी दूर करण्यासाठी अब्दुल सत्तार यांना महापालिकेत महापौरपद देण्यात आले. आता लोकसभा निवडणुकीनंतर राज्यपाल नियुक्त जागा भरावयाच्या असल्याने मुस्लिम समाजाने पुन्हा विधिमंडळात प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली. महापौर अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात जवळपास 300 मुस्लिम बांधवांनी गुरुवारी प्रगती महिला मंडळ सभागृहात चव्हाणांची भेट घेऊन ही मागणी केली. महापौर अब्दुल सत्तार व माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला यांची नावे चर्चेत आहेत.
मागणी आली आहे, प्रयत्न सुरूआहेत
नांदेड जिल्ह्यातून मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावे, ही मागणी माझ्याकडे आली आहे. माझीही तीच भूमिका आहे. त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. र्शेष्ठींकडे मी शिफारसही केली. राज्यपातळीवर ही नावे ठरणार असल्याने ती कशा पद्धतीने ठरवली जातात यावर अवलंबून आहे. सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादीच्या कोट्यातून परिषदेवर जाणार आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातून काँग्रेसच्या कोट्यातून दुसर्‍याला उमेदवारी मिळू शकते. परंतु आता र्शेष्ठी काय निर्णय घेतात ते पाहू. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार

चव्हाणांनी शिफारस केली
मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी आम्ही केली. त्याला चव्हाणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. चव्हाणांनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावे यासाठी र्शेष्ठीकडे शिफारसही केली आहे. अद्याप काँग्रेसतर्फे नावे जाहीर झाली नाहीत. त्यामुळे मागणी मान्य होईल, अशी आशा आहे. अब्दुल सत्तार, महापौर नांदेड