नांदेड - मुसलमान मते काँग्रेस-राष्ट्रवादीची जहागिरी नाही. विधानसभा निवडणुकीत एमआयएममुळे या व्होटबँकेला धक्का लागल्यानेच काँग्रेस नेते चवताळल्यासारखे विधानं करीत सुटले आहेत. प्रणिती शिंदे यांनी जाहीर माफी मागितली नाही तर एमआयएम कायदेशीर कारवाई करेल, असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
एमआयएमविरुद्ध राज्यात उठलेल्या वादळावर त्यांना ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने प्रतिक्रिया विचारली असता मोईन म्हणाले, समाजातील इतर जातींनी एखादा राजकीय पक्ष स्थापन केला तर त्याला काँग्रेस पक्षाचा आक्षेप नसतो. मुसलमानांनी जर
आपल्या न्याय्य हक्काच्या लढ्यासाठी राजकीय पक्ष स्थापन केला तर काँग्रेसला मोठी आपत्ती वाटते. मुसलमानांनी आपल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाच्या मागे जाऊ नये, अशी काँग्रेसची मानसिकता आहे. दलित मतांबद्दलही त्यांची हीच भूमिका आहे. गेल्या ६० वर्षांत काँग्रेसने मुसलमानांचा केवळ व्होट बँक म्हणून उपयोग केला. मुसलमानांवरील या अन्यायाच्या विरोधात एमआयएम पुढे येऊन त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी राजकीय पक्ष स्थापन केला. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन आमदार विजयी झाले. अनेक जागांवर दुस-या क्रमांकावर एमआयएम राहिली. ते काँग्रेसला पाहवत नाही, असेही मोईन म्हणाले.
बंदीसाठी २० ला मोर्चा
आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएमवर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. याच मागणीसाठी येत्या २० तारखेला मोर्चा काढण्याचा निर्णय क्षत्रिय राजपूत संघटना व विहिंपच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. गाडीपुरा येथील रेणुकामाता मंदिरात हिंदू समाज संघटनेची बैठक घेतली. या बैठकीत एमआयएमवर सडकून टीका करण्यात आली. असदुद्दीन ओवेसी व अकबरोद्दीन ओवेसी हे बंधू हिंदू देवतांचा अपमान करतात, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.