आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"माय जालना' अँड्राॅइड अॅप राज्यासाठी पथदर्शी, जिल्ह्याची माहिती मोबाइलवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या "माय जालना' अँड्रॉइड अॅपद्वारे संपूर्ण जालना जिल्ह्याची माहिती आता मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. मुंबईच्या राज्य सूचना व विज्ञान अधिकारी कार्यालयानेही याची दखल घेतली असून राज्यात सर्व जिल्ह्यांत असे मोबाइल अॅप विकसित केले जाणार आहेत. डिजिटल इंडिया सप्ताहात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जालन्यास राज्यात प्रथम येण्याचा मान नुकताच मिळाला आहे. आता "माय जालना' अॅपमुळे जालना पुन्हा राज्यासाठी पथदर्शी ठरणार आहे.

जालना जिल्ह्याची संपूर्ण माहिती या अॅपमुळे सहज उपलब्ध होणार आहे. माय जालना अॅपचा दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या अॅपमध्ये मराठी व इंग्रजी असे दोन पर्याय ठेवण्यात आले असून त्यामुळे आवडीनुसार भाषा निवडता येणार आहे. जिल्ह्याचा परिचय, इतिहास, भौगोलिक, औद्योगिक माहिती, पर्यटनस्थळे, लोकसंख्या जनगणना-२०११, लोकप्रतिनिधी, व्यक्तिमत्त्वे, आकर्षण, रेल्वे वेळापत्रक, नकाशा, रस्ते, महत्त्वाचे संपर्क क्रमांक आदींचा यात समावेश आहे. यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय, सामान्य प्रशासन, पुरवठा, रोहयो, भूसंपादन, पुनर्वसन, निवडणूक, नियोजन, मानव विकास, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यासह जिल्हा परिषद, नगरपालिका, पोलिस अधीक्षक कार्यालयाचे संपर्क क्रमांक व इतर महत्त्वाची माहितीही अॅपद्वारे पाहता येऊ शकते.

प्रत्येकाला मिळेल माहिती
आपण राहत असलेल्या जिल्ह्याची माहिती असावी, असे प्रत्येकालाच वाटते. यात शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी परीक्षा व मुलाखतीच्या दृष्टीने ही माहिती ठेवतात. शिवाय सर्वसामान्य माणसालासुद्धा शासकीय-निमशासकीय किंवा वैयक्तिक कामासाठी विविध कार्यालये, अधिकारी, तेथील कामकाजाची माहिती हवी असते. माय जालना अँड्रॉइड अॅपद्वारे ही माहिती आता प्रत्येकाला पाहावयास मिळणार आहे. भविष्यात शासनाच्या विविध योजना, चालू घडामोडी, नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना, आवाहन यांचाही अॅपमध्ये समावेश करणे प्रस्तावित आहे. यासाठी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी कार्यालयाची यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.

ई-गव्हर्नन्सनंतर आता एम-गव्हर्नन्स
ई-गव्हर्नन्सअंतर्गत विविध प्रकारची प्रमाणपत्रे, सातबारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया उपक्रमात उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यात जालन्याने अव्वल क्रमांक मिळवला अाहे. आता ई-गव्हर्नन्सनंतर एम-गव्हर्नन्स अर्थात मोबाइल गव्हर्नन्सच्या माध्यमातून जनतेला सेवा देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे.

अॅपची माहिती मागवली
माय जालना अँड्राॅइड अॅपची माहिती आम्ही मागवली आहे. या अॅपसाठी वापरण्यात आलेले संगणकीय भाषेतील कोड कोणते आहेत, याबाबत चर्चा केली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत अशा प्रकारचे अॅप विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जालन्याच्या टीमने चांगले काम केले आहे.
माेईज हुसेन अली, राज्य सूचना व विज्ञान अधिकारी, मुंबई.

अॅप ही तर सुरुवात...
जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने नागरिकांच्या काही सूचना किंवा सल्ले असतील तर जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावेत. माय जालना अँड्राॅइड अॅप ही सुरुवात असून त्यात आणखी माहिती समाविष्ट करावयाची आहे.
ए. एस. आर. नायक, जिल्हाधिकारी, जालना.
बातम्या आणखी आहेत...