आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत बालकाचा गूढ मृत्यू, घरात चोरीही, सावत्र आईची पोलिस ठाण्यात तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - कारेगाव रस्त्यावरील व्यंकटेशनगरातील नकुल व्यंकट वडगावकर (९) या मुलाचा त्याच्या घरीच सोमवारी गूढ मृत्यू झाला. त्याच्या सावत्र आई व वडिलांनी नवा मोंढा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत तो घरातच अत्यवस्थ आढळल्याचे व अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दागिने पळवल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नकुलच्या मृत्यूविषयी गूढ निर्माण झाले आहे.

व्यंकटेशनगरातील कोकडवार यांच्या दोन मजली निवासस्थानात चार भाडेकरू वास्तव्यास असून त्यात व्यंकट वडगावकर यांचाही समावेश आहे. वडगावकर पत्नी श्वेता व मुलगा नकुल याच्यासह तेथे राहत असून त्यांचा संगणक खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. वसमत रस्त्यावर त्यांचे दुकान आहे. ते कामानिमित्त मुंबईस गेले होते. त्यामुळे पत्नी व मुलगा हे दोघे घरीच होते. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास श्वेता वडगावकर मुलाला घरीच ठेवून पतीच्या दुकानात गेल्या होत्या. सायंकाळी सातच्या सुमारास त्या घरी आल्यानंतर वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये नकुल बेडवर झोपलेल्या अवस्थेत होता. त्याच्या तोंडास फेस येत होता. त्याच वेळी या खोलीतील कपाट उघडे होते. आतमधील दागिनेही गायब झाले होते. त्यामुळे शेजारी संतोष डहाळे व त्यांच्या पत्नी सुचिता डहाळे, विलास गंदेवार यांनी तातडीने नकुलला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले; तेथे त्याला मृत घोषित केले. मंगळवारी पहाटे व्यंकट वडगावकर
हेही परभणीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी नवा मोंढा पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

श्वेता ही नकुलची सावत्र आई
दत्तधाम परिसरातील स्विस अकॅडमी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या नकुलची श्वेता ही सावत्र आई. व्यंकट वडगावकर यांच्या पहिल्या पत्नीने चार वर्षांपूर्वी आत्महत्या केल्यानंतर त्यांनी श्वेताशी दुसरे लग्न केले. लग्नानंतर तिनेच नकुलचा सांभाळ केला.