आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टंचाईवर मात करण्यासाठी लातुरात विस्तारतेय जलपुनर्भरण चळवळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - पाणीटंचाईच्या नैसर्गिक आपत्तीला गोंजारत बसण्याऐवजी त्यावर मात करण्यासाठी लातूर शहरात पावसाचे आणि सांडपाण्याचे पाणी पुन्हा जमिनीत मुरवण्याची चळवळ सुरू झाली आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग आणि नाम फाउंडेशनच्या तांत्रिक मदतीने सुरू झालेल्या या चळवळीमुळे दीड हजार घरांमध्ये पुनर्भरणाचे काम पूर्ण झाले असून पाच हजार घरांमध्ये काम प्रगतिपथावर आहे. लातूर शहराला आजवरच्या ज्ञात इतिहासात पहिल्यांदाच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. २००२ मध्येही जलस्रोत आटल्यानंतर लातूर शहर केवळ बोअरच्या पाण्यावर तगले होते. मात्र, या वर्षी ६०० फुटांपर्यंतचे बोअरही आटल्यामुळे शहरात भीषण टंचाई आहे. अशा अडचणीच्या काळातही शहरात यापूर्वी ज्यांनी पुनर्भरणाचे प्रयोग केले आहेत त्यांच्या अगदी २०० फूट खोल असलेल्या बोअरला पुरेसे पाणी आहे.
त्यातून बोध घेत अनेकांनी आपल्या घरातील बोअरशेजारी मोठे खड्डे घेऊन त्यात पावसाचे पाणी मुरेल अशी व्यवस्था केली आहे. तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने सांडपाण्याचेही पुनर्भरण करण्यासाठी मॅजिक पीट तंत्रज्ञानाचा प्रसार सुरू केला आहे. तसेच त्यासाठीचे तांत्रिक साहाय्यही देऊ केले आहे. यालाही मोठा प्रतिसाद मिळत असून सुमारे २०० च्या वर फ्लॅटधारकांनी हे काम आपल्याकडे करवून द्यावे यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या कार्यालयात संपर्क केला आहे. नाम फाउंडेशननेही यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनीही तांत्रिक मदत मोफत दिली आहे.

राजकीय पक्ष आणि संघटनांनी मात्र जलपुनर्भरणाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. शहराचे, जिल्ह्याचे नेते म्हणवून घेणारेही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. विशेष म्हणजे सरकारी कार्यालयेच काय, तर खुद्द महापालिकेच्याच इमारतींचेही पुनर्भरण झालेले नाही.
गरज १८०० कोटी लिटरची
लातूर शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ १२३ चौरस किमी. इतके आहे. या क्षेत्रावर ६०० मिलिमीटर पाऊस पडला तरी हे प्रमाण होते तब्बल ७२०० कोटी लिटर. प्रत्यक्षात शहराची साडेपाच लाख लोकसंख्या पाहता शहराला वर्षभरात केवळ १८०० कोटी लिटर पाणी लागते, असे आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव यांंनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...