आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करारनाम्याची मुदत संपूनही नगराध्यक्षांचा राजीनाम्यास नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - एकछत्री अंमल असणार्‍या तुळजापूर पालिकेत निवडणुकीपूर्वी सर्व नगरसेवकांमध्ये समझोता झाला होता. त्या समझोत्यानुसार नगराध्यक्षपदाचा एक वर्षाचा कालावधी संपूनही राजीनामा देण्यास नगराध्यक्षांनी नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.27) बोलाविण्यात आलेली सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षांवर दबाव वाढविण्यासाठी सभेतील एकही विषय मंजूर होऊ न देण्यावर सर्व नगरसेवक ठाम आहेत.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेमुळे महिनाभर उशिराने तुळजापूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी होत आहे. गेल्या महिनाभरापासून सभा न झाल्याने अनेक महत्त्वाचे विषय रेंगाळले आहेत. त्यातच निवडणुकीपूर्वी झालेल्या समझोत्यानुसार एक वर्षाची मुदत संपल्यानंतरही नगराध्यक्षांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या समझोता एक्सप्रेसला यामुळे चांगलाच ब्रेक लागला आहे. या प्रकारामुळे शुक्रवारी होणार्‍या सर्वसाधारण सभेची पदाधिकार्‍यांसह नागरिकांनाही प्रतीक्षा लागली आहे. गेल्या महिनाभरापासून सभा न झाल्याने पालिकेतील अनेक निर्णय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तुळजापूर पालिकेचा कारभार समझोता एक्सप्रेसमुळे जिल्ह्यासह राज्यभर चर्चेला आला. सत्ता राष्ट्रवादीची असली तरी निर्णय स्थानिक पातळीवर सर्वसंमतीने घेतले जातात. यानुसार निवडणुकीपूर्वी ठरलेल्या करारनाम्यानुसार आजपर्यंत सर्वकाही सुरळीत चालले. मात्र, यावेळी विद्यमान नगराध्यक्षांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने पुढे काय निर्णय घ्यायचा याबाबत शुक्रवारच्या सभेनंतरच चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्त्वपूर्ण समझोता
पालिकेतील सर्व 19 जागा राष्ट्रवादीकडे आहेत. सत्तेत येण्यापूर्वी राष्ट्रवादीने काही महत्त्वपूर्ण समझोते केले होते. यामध्ये सर्वांना संधी मिळावी म्हणून उपनगराध्यक्ष पदाची मुदत एक वर्षाची केली. त्यानुसार 5 वर्षांत 5 उपनगराध्यक्ष, स्वीकृत सदस्यांचा कालावधी 1 वर्ष, त्यानुसार पाच वर्षांत दहा स्वीकृत नगरसेवक. पहिले दीड वर्ष अर्चना गंगणे यांना तर नंतर एक वर्ष विद्याताई गंगणे यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली. विद्याताई गंगणे यांची एक वर्षाची नगराध्यक्षपदाची मुदत 16 जून रोजी संपली.
सभेतील विषय
- वार्डनिहाय स्वच्छतेचा ठेका देणे.
- कॅरीबॅगमुक्ती अभियान राबविणे.
- हद्दवाढ भागाचा विकास आराखडा तयार करणे.
- महावितरणच्या ‘अभय योजनेत’ सहभागी होणे.
- 13 वा वित्त आयोग, रस्ता फंड, वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत कामाचे बिल करणे.
यापूर्वी विनातक्रार राजीनामे
यापूर्वी अर्चना गंगणे यांनी आपला दीड वर्षाचा कालावधी संपल्यानंतर विनातक्रार राजीनामा दिला होता. तत्पूर्वी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, अनिता साळुंके यांनीही वर्षाचा कालावधी संपताच तत्काळ राजीनामा सादर केला होता. तसेच स्वीकृत नगरसेवक विनोद पलंगे, श्रीकृष्ण सूर्यवंशी, अफसर शेख यांनीही समझोत्यानुसार मुदत संपताच आपल्या पदांचे राजीनामे दिले होते.
निवडणूकपूर्व समझोत्यानुसार यापूर्वीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकांनी मुदत संपताच आपले राजीनामे दिले आहेत. विद्यमान नगराध्यक्षांनाही पक्षादेश पाळावाच लागेल.’’
नारायणराजे गवळी, गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस.