आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तवेरा-इनोव्हा गाडीची समोरासमोर धडक, तेलंगणात नायगावचे सहा भाविक ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- तिरुपती येथून दर्शन घेऊन परतणाऱ्या सहा व्यापाऱ्यांचा तेलंगणातल्या मुसापेठ येथे अपघाती मृत्यू झाला. मेहबूबनगर जिल्ह्यातील मुसापेठ येथे सकाळी पाच वाजताच्या सुमाराला व्यापाऱ्यांची तवेरा (एमएच २६ ई ४८६६) आणि इनोव्हा गाडीची समोरासमोर धडक झाली. सोमवारी रात्री ते नायगावकडे परत येत होते.

सुनील कर्णेवार, व्यंकट भुताळे, राजेश्वर श्रीनिवार, बालाजी पोतदार, शंकर पोतदार, माधव दिगंबर जाधव अशी मृतांची नावे आहेत. शिवदास आरळीकर व तवेराचा चालक गणेश कुंटूरकर (रा. कुंटूर) हे दोघे जखमी झाले. त्यांना महेबूबनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात ठार झालेले सर्व जण ३०-३५ वयोगटातील होते. भुताळे हे पानपट्टीचालक होते. कर्णेवार यांचे जनरल स्टोअर्स आहे. श्रीनिवार हे सराफा व्यापारी होते, तर पोतदार हे दागिने घडवणारे कारागीर होते. हे सर्व जण मित्र होते. अपघाताची बातमी सकाळीच नायगावला पोहोचल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली. या घटनेमुळे गावातील व्यापाऱ्यांनी दिवसभर आपली दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली.

दुचाकी-कार अपघातात वडवणीजवळ दोघे ठार-
वडवणीजवळील बाहेगव्हाण फाट्यावर दुचाकी-कारच्या अपघातात २ ठार, दोन जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सात वाजता घडला. कारचालक फरार झाला. बीड परळी राज्य महार्गावरील बाहेगव्हाण फाट्यानजीक पुण्याहून नांदेडकडे निघालेल्या कार व नांदेडहून पुण्याला जात असलेल्या दुचाकीची धडक झाली. दुचाकीवरील चंदू नारायण देशमुख (२१), इंद्रराज शामराव काळे (२२ रा. वडगाव . जि. नांदेड) या दोघांचा यात मृत्यू झाला.