आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळदुर्ग घरकुल गैरव्यवहार प्रकरणी लवकरच कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे नगरपालिकेच्या घरकुल योजनेत झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे प्राप्त झाला आहे. या प्रकरणातील दोषींवर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता यांनी दिली. भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी विधान परिषदेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.

नळदुर्ग येथील नगर परिषदेच्या घरकुल योजनेतील गैरव्यवहारासंबंधी भाजपचे सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी नागपूर अधिवेशनात विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यामध्ये नळदुर्ग पालिकेतील आयएचएसडीपी घरकुल योजनेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झाली काय, चौकशी झाली असल्यास त्यामध्ये दोषी अधिकारी, पदाधिकारी व ठेकेदारांवर शासनाने कोणती कारवाई केली आदी प्रश्न विचारले होते. या प्रश्नांना गृह राज्यमंत्री मेहता यांनी उत्तर दिले.

यामध्ये त्यांनी नळदुर्ग घरकुल गैरव्यवहाराची तक्रारीच्या अनुषंगाने उस्मानाबादच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी पूर्ण करण्यात आली असल्याचे सांगितले. यामध्ये तत्कालीन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व तत्कालीन मुख्याधिकारी दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाईबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे सादर केला आहे.

त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही याप्रकरणी जनहित याचिका दाखल असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. लवकरच या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे मेहता यांनी सांगितल्याची माहिती भाजपकडून पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...