आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड मनपात शिवसेना आमदाराच्‍या बळावर कमळाला खतपाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- नांदेड महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने शहरात हळूहळू प्रचाराचा वेग वाढत आहे. त्यातच रविवारी शहरात भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद््घाटन लोहा-कंधार विधानसभेचे शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झाल्याने आजपर्यंत पडद्यामागे राहून भाजपला बळ देणाऱ्या आमदारांचा सहभाग उघड झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.  शिवसेना नेतृत्वाने मात्र अद्याप यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.    
 
मागील काही दिवसांपासून  चिखलीकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करण्याची एकही संधी सोडत नव्हते. त्यानंतर त्यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेचे चार नगरसेवक, राष्ट्रवादीचे दोन व काँग्रेसचे पाच अशा ११ नगरसेवकांसह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा सोहळा मुंबईत फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला होता. ज्या ठिकाणी हा सोहळा झाला त्याच परिसरात आ. चिखलीकरही होते. मात्र, ते प्रवेश सोहळ्यास उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर शिवसेनेच्याच चार नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. यामागे शिवसेनेचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचा सहभाग लपून राहिला नव्हता. आता तर तो त्यांच्या हस्ते भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद््घाटन झाल्याने उघड झाला आहे.    
अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक
नांदेड जिल्ह्यात आ. पाटील यांची ओळख खासदार अशोक चव्हाण यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अशीच आहे. अगदी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद निवडणूक असो की विधानसभा, विधान परिषदेची निवडणूक असो तेथे आ. चिखलीकर अशोक चव्हाण यांच्याशी सर्व शक्तीनिशी लढत देतात. आता महापालिका निवडणूक असल्याने भाजपने आ. चिखलीकर यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. कारण जिल्ह्यात तेच एकमेव असे नेते आहेत, जे अशोक चव्हाण यांच्याशी लढत देऊ शकतात,      
 
 संख्याबळ वाढण्यास मदत
सध्या मनपात एकूण ८१ पैकी भाजपचे केवळ दोन नगरसेवक आहेत. त्या तुलनेने काँग्रेस ४१, राष्ट्रवादी १०, शिवसेना १४, एमआयएम ११ व अपक्ष ३ असे संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ दोनवरून दोन आकड्यापर्यंत जाण्यास नक्कीच मदत होणार आहे.  
 
शिवसेना नेतृत्वाची चुप्पी    
आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेतच राहून सध्या उघडपणे भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. असे असले तरी अद्याप शिवसेना नेतृत्वाने आ. चिखलीकरांबाबत काहीच ठोस अशी भूमिका घेतलेली नाही. दरम्यानच्या काळात त्यांचे मन वळवण्यासाठी मंत्री रामदास कदम, पालकमंत्री अर्जुन खोतकर यांना नांदेड येथे पाठवले होते. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. आता शिवसेना आ. चिखलीकरांवर काय कारवाई करते याकडे नांदेड शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...