आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nanded Division Will Join To Central Railway Railway Minister Prabhu

नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्यास रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंचा हिरवा कंदील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत असलेला नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडावा, या मागणीला सोमवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा कंदील दाखवल्याने २० वर्षे जुनी मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सिकंदराबाद-विशाखापट्टणम, नांदेड-औरंगाबाद या साप्ताहिक एक्स्प्रेसच्या उद्घाटनप्रसंगी प्रभू यांनी रेल्वे बोर्डाला या मागणीबाबत लक्ष घालायला सांगून जर मागणी मान्य होण्यासारखी असेल तर तातडीने पूर्ण करा, असेही सांगितले. राज्य सरकारबरोबर कंपनी स्थापन करून रेल्वे विकासाची कामे करण्यात येतील, असेही प्रभू यांनी सांगितले.
दक्षिण मध्य रेल्वेने सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एकाच वेळी दोन गाड्यांचे उद्घाटन पार पाडले. सिकंदराबाद स्थानकावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रिमोटद्वारे कळ दाबून गाड्यांना सिग्नल दिला, तर खासदार अशोक चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवली. दोन वेगवेगळ्या गाड्यांचे एकाच वेळी वेगवेगळ्या स्थानकांवरून उद्घाटन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे विभागीय व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांनी सांगितले.

औरंगाबाद - नांदेड गाडीची वेळ बदला
खासदार अशोक चव्हाण यांनी नव्याने सुरू होणा-या गाडीची औरंगाबादहून सुटण्याची वेळ बदलण्याची मागणी केली. ही गाडी रात्री १ वाजेच्या सुमाराला सुटणार आहे. तथापि, औरंगाबाद येथून हायकोर्ट सुटल्यानंतर दुसरी गाडी रात्री १० पर्यंत नाही. या दोन गाड्यांच्या दरम्यान रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान ही गाडी औरंगाबाद येथून सोडावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

तिरुपती-शिर्डी रेल्वेगाडी मिळणार
सिकंदराबाद स्थानकावर उद्घाटन समारंभात स्थानिक केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्यासह स्थानिक नेत्यांनी शिर्डी गाडी सुरू करण्याची मागणी केली. त्यावर सुरेश प्रभू यांनी आपल्या भाषणात जनभावना लक्षात घेता तिरुपती-शिर्डी गाडी सुरू करण्याबाबत आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

उद्घाटनाची ट्रेन विलंबाने सुटली
नांदेड-औरंगाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस नियमितपणे शुक्रवारपासून सुरू होणार आहे. या गाडीच्या उद्घाटनानिमित्ताने सोमवारी विशेष गाडी सोडण्यात आली. या गाडीची सुटण्याची वेळ सकाळी ११.३० वाजता होती. उद्घाटनासाठी रेल्वेमंत्री प्रभू सिकंदराबाद स्थानकावर येणार होते. ते तिथे ११.४५ वाजता पोहोचेल. भाषणे झाल्यानंतर दुपारी १२.१५ वाजता गाडी सुटली.