आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लक्ष्मी’आली घरा!, राज्यभरात मुलींचा जन्मदर घटत असतानाच नांदेडमध्ये वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - वंशाच्या दिव्यासाठी गर्भातच ‘पणती’ची हत्या होत असल्यामुळे राज्यभरात मुलींचा जन्मदर घटत असतानाच नांदेडमध्ये मात्र या वर्षी समाधानकारक वाढ झाली आहे. जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या अभियानामुळे मुलींच्या जन्मदरात दरहजारी 28 ने वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या ‘लक्ष्मी आली घरा’ अभियानामुळे लोकांच्या मानसिकतेतही हळूहळू सकारात्मक बदल होताना दिसत आहे.

मुलगाच पाहिजे या हव्यासापोटी अनेक जोडपी गर्भातच स्त्री भ्रूणहत्या करीत आहेत. गर्भलिंगनिदान केंद्रे खेडोपाडी निघाली. यातून मोठा सामाजिक असमतोल निर्माण झाला. मुलींचे दरहजारी प्रमाण घटले. यामुळे सर्वांनाच चिंता वाटू लागली. त्यानंतर सरकार, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना यांनी आवाज बुलंद केल्यानंतर सुदाम मुंडेसह राज्यात अनेक ठिकाणी डॉक्टरांवर कारवाई झाली. सोनोग्राफी केंद्रांवर धाडी पडल्या. गर्भलिंगनिदानाचे प्रकार पूर्णत: बंद झाले नसले तरी त्यावर मोठय़ा प्रमाणात लगाम कसला गेला.

आशेची ज्योत : नांदेड जिल्ह्यात मार्च 2010 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकर परदेशी यांनी स्त्री भ्रूणहत्येला प्रतिबंध घालण्यासाठी अभियान हाती घेतले. जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरवर धाडी घातल्या. देगलूर येथील डॉ. शिवराज एकलारे या डॉक्टरला 1 जानेवारी 2012 रोजी देगलूरच्या न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 10 हजारांचा दंड ठोठावला. याच कालावधीत नांदेड शहरातील 10 डॉक्टरांवर गुन्हेही दाखल केले. त्यामुळे गर्भलिंगनिदान करण्याच्या प्रवृत्तीला बराच आळा बसला. त्या पर्शिमांचे फळ आता दिसत आहे. 2011-12 मध्ये नांदेड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर 887 होता. तो 2013 मध्ये 915 वर पोहोचला आहे.

जन्मदरात वाढ
जिल्ह्यात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले आहे. हे चित्र आशादायक असले तरी समाधानकारक नाही. त्यात अजून वाढ होण्याची गरज आहे. शहरातील काही सोनोग्राफी केंद्रांवर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या 92 सोनोग्राफी सेंटर आहेत. ही सामाजिक समस्या आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्याचा हात पुढे करावा.
डॉ.एन.जी.राठोड, सीएस, नांदेड

आरोग्य खात्याची ‘लेक वाचवा’ योजना
मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी 8 मार्चपासून आरोग्य खात्याने योजना हाती घेतली आहे.
जिल्ह्यातील 60 हजार गरोदर स्त्रियांना गर्भलिंगनिदान व मुलगी असल्यास गर्भपात करू नये यासाठी व्हॉइस कॉलने सल्ला देणे.
आकाशवाणीच्या माध्यमातून रेडिओ जिंगल्स प्रसारित करणे
एक व दोन स्त्री अपत्ये असलेल्या मातांची यादी अद्ययावत करणे
स्त्री अपत्य असलेल्या महिलेच्या सतत संपर्कात राहून माहिती ठेवणे
सोनोग्राफी केलेल्या किंवा गर्भपात केलेल्या महिलांच्या नोंदी ठेवणे
शासकीय रुग्णालयात जन्म घेणार्‍या मुलीचे थाळी व वाजंत्री वाजवून स्वागत करणे, पूजन करणे
‘लक्ष्मी आली घरा’ ही संकल्पना जनमानसात रुजवणे
ग्रामीण भागात ग्रामसेवक व आशा कार्यकर्ती यांच्या साहाय्याने चावडी वार्ता घेऊन जनजागरण करणे
शहर पातळीवर खासगी रुग्णालयात कार्यरत कंपाउंडर व दाया यांच्या कार्यशाळा घेऊन 300 कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे
पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रसारासाठी सर्वत्र पोस्टर्स, बॅनर लावून जनजागरण करणे

पुढे काय ?
मुलींचा जन्मदर 915 पर्यंत पोहोचला तरी त्यात वाढ होणे आवश्यक आहे. या वर्षी हा जन्मदर 950 पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आरोग्य विभागाने ठेवले आहे. त्या दृष्टीने व्यापक योजना आरोग्य खात्याने हाती घेणे अपेक्षित आहे. अवैध सोनोग्राफी केंद्रे आणि गर्भपात करणार्‍या डॉक्टरांवर कारवाईचा बडगा सुरू राहिल्यास लोकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल झाल्यास हे उद्दिष्ट गाठणे सहज शक्य होऊ शकते.