आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैनगंगेला पूर, नांदेड-नागपूर महामार्ग ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - मराठवाड्यातून विदर्भाला जोडणार्‍या हदगावजवळील पैनगंगा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने मंगळवारी सायंकाळी साडसहा वाजेपासून नांदेड-नागपूर मार्गावरील वाहतूकबंद झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील काही मार्गावरील वाहतूक खंडित झाली आहे. विष्णुपुरी जलाशय 100 टक्के भरल्यामुळे मंगळवारी दोन दरवाजे उघडण्यात आले. जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात एकूण 644.43 (सरासरी 40.29) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 57.30 टक्के पाऊस झाला आहे. इस्लापूरजवळ खैरगाव नाल्याला पूर आल्याने नांदेड-किनवट, तर हदगाव-बाळापूर मार्गावरील रुई-धानोराजवळ कयाधू नदीच्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने हदगाव-आखाडा बाळापूर-कळमनुरी मार्गावरील वाहतूक बंद पडली. किनवट-पिंपळगाव मार्गावर बेल्लोरीजवळ पहाटे पाच वाजता नाल्याच्या पुरात एक ऑटो वाहून गेला. ऑटोचालक जलपत नामदेव मेश्राम सुदैवाने बचावला.


गंगाखेड-पालम वाहतूक बंद
परभणी । जिल्ह्यात संततधार पावसाने चौथ्या आठवड्यातही हजेरी कायम ठेवली आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यात 16.99 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे गंगाखेड-पालम रस्त्यावरील केरवाडीजवळील जुन्या पुलावरून पाणी जात असल्याने मंगळवारी पहाटेपासून या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. गंगाखेड-नांदेड वाहतूकही बंद आहे.